व्यक्तीचा अपघाती किंवा संशयी मृत्यू झाल्यावर अनेकदा मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. मृत्यूचे नेमके कारण काय ? मृत्यूच्या वेळी काय चुकले आहे ? भविष्यात त्या टाळण्यासाठी कोणते उपाय करू शकतो ? याची माहिती व्हावी, हा यामागचा मुख्य हेतू असतो. काही वेळा आजारामुळे मृत्यू झाल्यावरही शवविच्छेदन केले जाते. सध्या वर्तमानपत्रांतून अनेक विश्वासाच्या नात्यांनी एकमेकांचे जीवन संपवल्याच्या घटना वाचायला मिळतात. आत्महत्या, अपघात यांचे प्रमाणही वाढले आहे. मृत्यू कधी, कुठे येईल, हे काहीच सांगू शकत नाही. संशयास्पद मृत्यूचे प्रमाण वाढल्याने शवविच्छेदन करावे लागते. काही वेळा ‘शवविच्छेदन’ ही काळाची आवश्यकता झाल्याचे लक्षात येते.
हेतू कितीही शुद्ध असला, तरी मृत व्यक्तीशी ज्यांचे रक्ताचे नाते असते, त्यांना त्या देहाची चिरफाड झालेली नको असते. मृत्यूचे कारण समजल्यास अनेकांना याविषयी सावध करता येईल, हे जरी खरे असले, तरी निधन झालेली व्यक्ती पुन्हा येणार नसते. जीव जन्माला येतांना देहाचे वस्त्र परिधान करून येतो. व्यक्तीचे पूर्वसुकृत, संचित, प्रारब्ध यांनुसार ती देह धारण करत असते. पंचतत्त्वांचा हा देह देवाच्या कृपेने या भूलोकी येतांना जसा परिपूर्ण आला, तसाच पंचतत्त्वात विलीन होतांनाही तो परिपूर्ण असावा, अशी साधी अपेक्षा प्रत्येक व्यक्ती आणि त्याचे नातेवाइक यांची असते. शवविच्छेदनासाठी नेणार्या देहातील काही अवशेष चोरून विकण्याच्या विकृत घटनाही घडतात.
काही वेळा आपण अशा घटना वाचतो की, व्यक्तीचे हृदय बंद झाले; परंतु काही काळाने ते परत चालू झाले. व्यक्तीचे हृदय चालू झाल्यावर ती व्यक्ती तेथील घटनाक्रम अन् वैद्यांचे बोलणेही व्यवस्थित सांगते. हे कसे शक्य होते ?, तर त्या कालावधीत म्हणजे हृदयक्रिया बंद असतांना व्यक्तीचा लिंगदेह त्या देहाभोवती असतो, तो सर्व पहात असतो. त्यामुळे बुद्धीला कळणार्या स्थूल जगापेक्षा बुद्धीच्या पलीकडचे सूक्ष्मातील जगही मोठे आहे, हे लक्षात येते. ते समजण्यासाठी श्रद्धा आणि साधना या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. धर्मशास्त्रानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर लिंगदेह देहाभोवती घुटमळत असतो, त्याला देहाची आसक्ती सुटण्यास काही काळ लागतो. हिंदु धर्मशास्त्रामध्ये दिलेले विविध विधी हे लिंगदेहाला गती मिळण्यासाठी आहेत.
समजा शवविच्छेदनातून व्यक्तींचे अवयव काढून विकण्याच्या घटना घडल्या, तर लिंगदेह तिथेच घुटमळू शकतो. परिणामी असे गैरकृत्य करणारा आणि ज्याला अवयवदान झाले, त्या रुग्णाला आध्यात्मिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘देह पंचतत्त्वात विलीन होतांना पूर्णत्वाने आणि हिंदु धर्मशास्त्रानुसार मृत्यूत्तर क्रियाकर्म करून विलीन झाला पाहिजे’, असे धर्मशास्त्र सांगते.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी