Kerala Ragging Case : केरळमध्ये नर्सिंग महाविद्यालयामध्ये ३ विद्यार्थ्यांना रॅगिंग (छळ) करून केले घायाळ !

५ विद्यार्थ्यांना अटक

आरोपी विद्यार्थी

कोट्टायम (केरळ) – येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये कनिष्ठ विद्यार्थ्यांच्या ‘रॅगिंग’ची घटना समोर आली आहे. यात ५ वरिष्ठ विद्यार्थ्यांनी प्राथमिक वर्षातील ३ विद्यार्थ्यांचे कपडे काढले. मग त्यांच्या गुप्तांगावर एक ‘डंबेल’ (जड वजन) ठेवण्यात आले. नंतर त्यांना ‘कंपास’ आणि धारदार वस्तू यांनी घायाळ केले. तसेच जखमेवर असे मलम लावले, ज्यामुळे त्यांच्या वेदना आणखी वाढल्या. जेव्हा पीडित विद्यार्थी वेदनेने ओरडू लागले, तेव्हा त्यांच्या तोंडातही मलम लावण्यात आले. तिघेही पीडित प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत आणि थिरूवनंथपूरम्चे रहिवासी आहेत. या घटनेचा व्हिडिओही बनवण्यात आला. त्यांना रॅगिंगची घटना बाहेर कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकीही दिली. पीडितांपैकी एकाने वडिलांना कळवल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर ही घटना उघडकीस आली.

आरोपी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना रॅगिंग विरोधी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. हे विद्यार्थी दारू खरेदी करण्यासाठी कनिष्ठ विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करत असत. ज्यांनी तसे करण्यास नकार दिला, त्यांना मारहाण करत.

संपादकीय भूमिका

  • विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण न दिल्याचा आणि साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !
  • शिक्षणाद्वारे व्यक्ती केवळ सुशिक्षित नाही, तर सुसंस्कृत अन् विनम्र होण्याची आवश्यकता असतांना तो गुन्हेगारी कृत्य करतो, याचा अर्थ शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठी खोट आहे, हे स्पष्ट होते !