महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेतलेल्या संत-महंत यांच्या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

संत-महंतांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा !

प्रयागराज – महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच मध्यप्रदेश अन् राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी विविध आखाड्यांतील संत-महंतांच्या भेटी घेऊन त्यांना जून महिन्यात गोवा येथे होणार्‍या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे निमंत्रण दिले, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. याविषयीचा छायाचित्रांसह सविस्तर वृत्तांत देत आहोत…  

डावीकडे श्री महंत सोमेश्वरानंद ब्रह्मचारी यांना ‘गंगाजी की महिमा’ हा ग्रंथ भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

 १. स्वामी नारायण संप्रदायाचे पू. श्यामप्रभु चरणदास यांची भेट

स्वामी नारायण संप्रदायाचे पू. श्यामप्रभु चरणदास आणि त्यांचे सहकारी यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य समजून घेतले. या वेळी पू. श्यामप्रभु चरणदास म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती सनातन धर्माचे ज्ञान समस्त हिंदु बांधवांपर्यंत पोचवण्याचे अमूल्य कार्य करत आहे. यातून हिंदु धर्माला पुनर्तेज प्राप्त होईल. सनातन धर्मातील ज्ञानाची विश्वातील प्रत्येक मनुष्याला आवश्यकता आहे. हे ज्ञान पोचवण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. समितीच्या कार्यकर्त्यांना भेटल्यावर मला आनंद झाला. समितीचे कार्य संपूर्ण विश्वात पोचावे, यासाठी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.’’

२. श्रीमद् जगदगुरु द्वाराचार्य नाभा  पीठाधीश्वर पू. सुतीराम देवाचार्यजी महाराज यांच्याकडून समितीच्या कार्याला आशीर्वाद

श्रीमद् जगदगुरु द्वाराचार्य नाभा पीठाधीश्वर पू. सुतीराम देवाचार्यजी महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेऊन कार्याची माहिती दिली. या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी पुष्पहार घालून आणि शाल देऊन त्यांचा सन्मान केला. पू. सुतीराम देवाचार्यजी महाराज यांनीही सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि श्री. सुनील घनवट यांना सन्मानवस्त्र देऊन सत्कार केला. पू. सुतीराम देवाचार्यजी महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले आणि कार्याचे कौतुक करून समितीच्या कार्याला आशीर्वाद दिला.

पू. हरजीत सिंह यांना कार्याची माहिती देतांना डावीकडून श्री. आनंद जाखोटिया आणि मध्यभागी श्री. सुनील घनवट

३. ‘आम्ही समितीसमवेत आहोत’,  असे सांगणारे ‘निहंग पंथा’चे पू. हरजीत सिंह !

समितीचे श्री. सुनील घनवट आणि समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी चंडीगड येथील निहंग पंथाचे पू. हरजीत सिंह यांची भेट घेतली. या वेळी पू. हरजीत सिंह म्हणाले, ‘‘आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या कार्यासमवेत आहोत. सनातन धर्म आणि भारतमाता यांसाठी बलीदान देण्याची शिखांची परंपरा आहे. भारताची गुरु-शिष्य परंपरा संपूर्ण विश्वापर्यंत पोचवायला हवी. गुरु-शिष्य परंपराच भारताला पुढे घेऊन जाईल. ही परंपरा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करूया.’’

४. श्री शंभू पंच अग्नि आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री श्री महंत सोमेश्वरानंद ब्रह्मचारी यांची भेट

श्री शंभू पंच अग्नि आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री श्री महंत सोमेश्वरानंद ब्रह्मचारी यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भेट घेऊन समितीच्या कार्याविषयी सविस्तर चर्चा केली. या वेळी महंत सोमेश्वरानंद ब्रह्मचारी म्हणाले की, समितीचे कार्य उत्कृष्ट आहे. तुम्ही हिंदु राष्ट्रासाठी स्वतःला झोकून देऊन कार्य करत आहात. अशा कार्याची वर्तमान काळात आवश्यकता आहे.

५. भारतासह विश्वातील सनातनप्रेमींनी समितीच्या कार्याचा लाभ घेण्याविषयी सांगणारे उदासीन आखाड्याचे श्री महंत धर्मेंद्र दास महाराज 

उदासीन आखाड्याचे श्री महंत धर्मेंद्र दास महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भेट घेऊन त्यांना महाकुंभातील प्रदर्शनस्थळी भेट देण्याचे निमंत्रण दिले, तसेच त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चालू असलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली. या वेळी श्री महंत धर्मेंद्र दास महाराज म्हणाले, ‘‘आता आम्ही भव्य आणि दिव्य अशा विषयांवर चिंतन अन् जागृती यांसाठी विचार केला आहे. हिंदु जनजागृती समिती भारतातील राज्यांत राष्ट्र आणि धर्म जागृती, धर्मसंस्कृती, हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण यांविषयी जे कार्य करत आहे, ते पुष्कळ सुंदर अन् चांगले आहे. समितीचे कार्य उत्कृष्ट आहे. मी भारतासह जगातील सर्व हिंदुत्वनिष्ठांना आवाहन करतो की, समितीच्या विषयांना पुढे घेऊन यावे. कुंभक्षेत्री समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा. समितीच्या वतीने ज्या विषयांची माहिती दिली जाते, त्याविषयी मी १३ आघाड्यांतील सर्व प्रमुखांशी चर्चा करीन. भारतात अशी ही हिंदु जनजागृती समिती आहे की, जे हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसाठी गावागावांत जनजागृतीचे कार्य करत आहे. तरुणवर्ग आणि सनातनप्रेमी यांना ही आनंदाची बातमी आहे. सनातन धर्मावर पुष्कळ श्रद्धा असल्याने महाकुंभाच्या ठिकाणी भाविकांचा प्रचंड ओघ वाढला आहे.’’

डावीकडे श्रीमद् जगद्गुरु अनंतानंदाचार्य स्वामी डॉ.  रामकमलदास वेदांतीजी महाराज यांना समितीच्या कार्याची माहिती पुस्तिका देतांना श्री. सुनील घनवट

६. काशीतील श्रीमद् जगद्गुरु अनंतानंदाचार्य स्वामी डॉ. रामकमलदास वेदांतीजी महाराज यांच्याशी भेट

श्री. सुनील घनवट यांनी प्रयागराज येथे भक्त वेदांत नगरचे श्रीमद् जगद्गुरु अनंतानंदाचार्य स्वामी डॉ.  रामकमलदास वेदांतीजी महाराज यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी श्री. घनवट यांनी त्यांना हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदु राष्ट्राच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. यासह त्यांना गोवा येथे होणार्‍या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे निमंत्रणही देण्यात आले.

७. हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाला विदेशी जिज्ञासूंची भेट

१. ब्रह्मचारीणी प्रभमा, नेदरलँड

नेदरलँड येथील ‘इंटरनॅशनल ग्रंथ सोसायटी’चे सदस्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य समजून घेतले. या वेळी अभिप्राय व्यक्त करतांना सोसायटीच्या ब्रह्मचारीणी प्रभमा म्हणाल्या, ‘‘सनातन धर्माचे ज्ञान जगभर पोचणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समिती हे कार्य करत आहे. सनातन धर्म समजून त्याचा अंगीकार केल्यास जीवनात आनंद येईल.’’

२. श्री. दयाल एन्. हरजनी, उद्योजक, हाँगकाँग

हाँगकाँग येथील उद्योजक श्री. दयाल एन्. हरजनी यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या वेळी श्री. दयाल एन्. हरजनी म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याने मी प्रभावित झालो. हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी सर्व संतांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. यासाठी सनातन बोर्डाची आवश्यकता आहे.’’

संपादकीय भूमिका

हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी सर्व संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी एकत्रित येणे आवश्यक !