प्रयागराज – महाकुंभक्षेत्री सेक्टर ७ मध्ये लावण्यात आलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शन कक्षाला भाविकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वैज्ञानिक परीक्षणाद्वारे हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेल्या दैनंदिन कृतींचे लाभ कसे होतात, हे पाहिल्यानंतर कक्षाला भेट देणार्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह, भगवंताप्रती असणारा भाव वृद्धींगत होत आहे. अनेकांनी कक्ष पाहिल्यानंतर भावविभोर होऊन, प्रेरित होऊन मनोगतही व्यक्त केले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेले मान्यवर कक्षाला भेट देऊन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याचे कौतुक करत आहेत. ४ फेब्रुवारी पर्यंत ८ सहस्रांहून अधिक भाविकांनी कक्षाला भेट दिली. हा प्रदर्शन कक्ष १५ फेब्रुवारी पर्यंत येथील सेक्टर ७ मध्ये ‘कलाकुंभ’ समोर चालू आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे महर्षि पृथ्वीवर आणखी व्हावेत ! – मंगलमणी त्रिपाठी, निवृत्त मुख्याध्यापक, कृषक माध्यमिक महाविद्यालय, देवरिया, उत्तरप्रदेश

महाकुंभातील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यानंतर मी भावविभोर झालो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने मी पुष्कळ प्रभावित झालो आहे. त्यांनी अशा मोठ्या विश्वविद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयामुळे लोकांना पुष्कळ लाभ होत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे महर्षि पृथ्वीवर आणखी व्हावेत, अशी प्रार्थना करतो. स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्रातून जसे तेज प्रक्षेपित होते, त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे चित्र पाहिल्यानंतर त्यातून तेज आणि प्रकाश प्रक्षेपित होत होता, असे मला जाणवले. अशा महान गुरुदेवांच्या चरणी मी कृतज्ञ आहे.
परिसरातील वातावरण कसे शुद्ध करावे, हे प्रदर्शन पाहून कळले !- डॉ. निशी गुप्ता, ‘सिनियर कंसल्टंट फॉर गायनेकोलॉजी’, जयपूर, राजस्थान

कक्षात येण्यापूर्वी मी विचार करत होते की, मला येथे काय मिळणार ? परंतु कक्षात आल्यानंतर मी सर्व फलक पाहिले आणि माहिती घेतली. दैनंदिन जीवनातील छोट्या कृतींमधून त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहे की, कसे आपण स्वतःभोवती असलेली नकारात्मकता अल्प करू शकतो, तसेच आपल्या परिसरातही वातावरण शुद्ध होण्यासाठी काय प्रयत्न करावेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून घेण्यात येणार्या ५ दिवसीय आध्यात्मिक शिबिरात मी निश्चित सहभागी होईन.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझ्यात सकारात्मकतेचा संचार झाला ! – हर्षद शर्मा, कथावाचक, वृंदावन

महाकुंभक्षेत्री उभारण्यात आलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर माझ्यात सकारात्मकतेचा संचार झाला, अशी अनुभूती मला आली. या प्रदर्शन कक्षात दाखवण्यात येणार्या व्हिडीओमधून माझ्या लक्षात आले की, देशी गायीकडून प्रक्षेपित होणार्या सकारात्मकतेची प्रभावळ ८ ते १० मिटर एवढी असते. असे असेल, तर घरात गाय आणल्यावर संपूर्ण घरात ती सकारात्मकता येईल.