SC On Necrophilia : महिलेच्या मृतदेहासमवेत लैंगिक संबंध ठेवणे बलात्कार नाही !

  • सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय ठेवला कायम !

  • संसदेने आवश्यकता वाटल्यास कायद्यात पालट करण्यास सुचवले !

नवी देहली – एका महत्त्वाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने ‘नेक्रोफिलिया’ला (मृतदेहासमवेत लैंगिक संबंध ठेवण्याच्या विकृतीला) बलात्कार मानण्यास नकार दिला. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ च्या अंतर्गत हा बलात्कार ठरत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ग्राह्य ठरवतांना सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपिठाने म्हटले की, या सूत्राची तपासणी करणे आणि आवश्यक असल्यास कायद्यात संबंधित पालट करणे संसदेचे काम आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कायदा ‘नेक्रोफिलिया’ला गुन्हा मानत नाही. त्यामुळे आरोपीला महिलेच्या मृतदेहासमवेत बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही.

कर्नाटक सरकारचा युक्तीवाद !

कर्नाटक सरकारकडून बाजू मांडणारे अतिरिक्त महाधिवक्ता (सॉलिसिटर जनरल) अमन पनवार यांनी असा युक्तीवाद केला की, कलम ३७५(क) अंतर्गत ‘बॉडी’ या शब्दात मृत शरिराचाही समावेश असावा. त्यांनी सांगितले की, बलात्काराच्या व्याख्येच्या ७ व्या तपशीलात असे म्हटले आहे की, जिथे महिला संमती देऊ शकत नाही, ती परिस्थिती बलात्कार मानली जाईल. अशा प्रकारे येथे देखील मृतदेह संमती देऊ शकणार नाही.

अधिवक्ता पनवार म्हणाले की, न्यायालयाने कलम ३७५ चा उदार अर्थ लावून मृतदेहांचा त्यामध्ये समावेश करावा. त्यांनी पंडित परमानंद कटारा विरुद्ध भारत संघ या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या वर्ष १९९५ च्या निर्णयाचाही उल्लेख केला, ज्यामध्ये म्हटले होते की, आदर आणि न्याय्य वागणूक मिळण्याचा अधिकार मृतदेहांनाही लागू झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने अतिरिक्त महाधिवक्ता अमन पनवार यांच्या युक्तीवादावर समाधान व्यक्त केले नाही आणि कर्नाटक सरकारची याचिका फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण ?

कर्नाटकातील या प्रकरणात आरोपीने २१ वर्षीय महिलेची हत्या केली होती. त्यानंतर त्याने मृतदेहासमवेत लैंगिक संबंध ठेवले होते. यावर कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि.च्या कलम ३०२ अंतर्गत हत्या, तर कलम ३७५ अंतर्गत बलात्कार यांसाठी दोषी ठरवले होते.

यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. कर्नाटक उच्च न्यायालयाने मे २०२३ मध्ये निर्णय दिला की, ‘नेक्रोफिलिया’ हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५ अंतर्गत बलात्काराच्या श्रेणीत किंवा कलम ३७७ अंतर्गत अनैसर्गिक लैंगिक संबंधांच्या गुन्ह्यात येत नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपीला हत्येचा दोषी ठरवले; परंतु बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.

बलात्कार प्रकरणातून आरोपीला निर्दोष सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.