रत्नागिरी येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते यांची उपस्थिती !

डावीकडून श्री. अजय केळकर, सद्गुरु सत्यवान कदम आणि दीपप्रज्वलन करतांना श्री. अनिल देवळे

रत्नागिरी, २ फेब्रुवारी (वार्ता.) – राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समाजात धर्म आणि राष्ट्र निष्ठा रुजवणार्‍या, समाजात हिंदुत्वाचे स्फुल्लींग चेतवणार्‍या अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गेली २५ वर्षे कार्यरत असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी सोहळा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात येथील टी.आर्.पी. जवळील अंबर सभागृहात पार पडला. या सोहळ्याला उद्योजक श्री. अनिल देवळे, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष वरिष्ठ प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, तसेच साधक यांची उपस्थिती होती. सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा ताम्हनकर आणि कु. मिथिला वाडेकर यांनी केले.

वर्धापनदिन सोहळ्याचा प्रारंभ सनातन संस्थेचे श्री. संतोष धनावडे यांनी शंखनाद करून, तसेच मान्यवरांच्या हस्ते निरांजनाने दीपप्रज्वलन करून करण्यात आला. त्यानंतर वेदमूर्ती श्री. अवधूत मुळ्ये आणि श्री. नितीन अभ्यंकर यांनी वेदमंत्रपठण केले. ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे श्री. शशिकांत घाणेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी केले.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. अनिल देवळे, सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. अजय केळकर

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन सद्गुरु सत्यवान कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 सन्मान आणि सत्कार

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विजय भाटकर यांनी केला, तर श्री. अनिल देवळे यांचा सत्कार सनातन संस्थेचे श्री. सहदेव गवळी यांनी केला. ‘सनातन प्रभात’चे विशेष वरिष्ठ प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचा सत्कार सनातन संस्थेचे श्री. महेश पवार यांनी केला.

उपस्थित सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा सन्मान सनातन संस्थेच्या सौ. वंदना चेचरे यांच्या हस्ते करण्यात आला.

ऊन, वारा आणि पाऊस या कशाचीही तमा न बाळगता साधना म्हणून ‘सनातन प्रभात’ अंकाचे वितरण करणारे रत्नागिरी येथील श्री. मच्छिंद्र खेराडे यांचा सत्कार सद्गुरु सत्यवान कदम यांनी केला. ते दैनिक ‘सनातन प्रभात’ची रत्नागिरी आवृत्ती चालू झाल्यापासून छपाई आणि वितरणाची गेली २५ वर्षे अविरत सेवा करत आहेत. तसेच रत्नागिरी मुद्रणसेवेशी संबंधित सेवा करणारे श्री. अनंत मालप यांचा श्री. अनिल देवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यातील वक्त्यांचे मनोगत…

केवळ वृत्तपत्र नव्हे, तर समाजाला हिंदु राष्ट्राच्या दिशेने कृतीप्रवण करणारे ‘सनातन प्रभात !’– सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु सत्यवान कदम

हिंदु राष्ट्राच्या चळवळीत ‘सनातन प्रभात’ची भूमिका लोकमान्य टिळक यांच्या दैनिक ‘केसरी’प्रमाणेच आहे. हिंदुत्वाच्या चळवळीला दिशा देणारे ‘सनातन प्रभात’ हे समस्त हिंदु संघटनांचे हक्काचे व्यासपीठ आहे. हिंदूंनी त्यांची संख्या वाढवली पाहिजे, असे काही जण म्हणतात, त्यांना ‘हिंदूंचे संख्याबळ ही शक्ती नसून, आहे त्या हिंदुशक्तीचा वापर धर्महितासाठी कसा केला जाईल’, हे पहाणे महत्त्वाचे आहे’, असा दृष्टीकोन ‘सनातन प्रभात’ देते. ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्यासाठी ‘उलटा लव्ह जिहाद करा’, असे काही जण म्हणतात. या संदर्भातही सनातनचा दृष्टीकोन ‘हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करणार्‍या धर्मांधांना पाप लागते. ते त्यांना भोगावेच लागते. हिंदूंनी तसेच केले, तर त्यांनाही पाप भोगावे लागेल. तसे होऊ नये; म्हणून त्यांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करावे.’

हिंदु राष्ट्र ही राजकीय संकल्पना नसून ती एक आध्यात्मिक संकल्पना आहे. हिंदुत्व, तसेच हिंदु राष्ट्र यांविषयीच्या आध्यात्मिक संकल्पना सुस्पष्ट करून त्याविषयी जागृती करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ गेल्या २५ वर्षांपासून करत आहे. या काळात अनेकदा ‘सनातन प्रभात’ला धमकावण्यात आले; परंतु ‘सनातन प्रभात’ निडरपणे एका धर्मयोद्ध्यासम लढत ताठ मानेने उभे आहे. ‘सनातन प्रभात’ने केवळ हिंदु समाजात जागृतीच केली नाही, तर समाजाला साधनाही शिकवली. त्यामुळे अनेक जणांनी धर्माचरणाला आरंभ केला. इतकेच नाही, तर ‘सनातन प्रभात’मध्ये कार्यरत असलेले काही जण हिंदु धर्माचे प्रवक्ते बनले, तर शेकडो साधक ‘सनातन प्रभात’च्या नियमित वाचनातून चांगले वक्तेही बनले आहेत. यातून ‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नसून समाजाला हिंदु राष्ट्राच्या दिशेने कृतीप्रवण करणारे प्रभावी माध्यम आहे, हेच दिसून येते.

हिंदूंनी लहान मुलांवर बाल्यावस्थेपासून साधना आणि राष्ट्र-धर्म कार्य करण्याचे संस्कार रुजवावेत ! – अनिल देवळे, उद्योजक

श्री. अनिल देवळे

हिंदूंनी आज धर्मशिक्षणास त्यांच्या घरापासून आणि त्यांची मुले बाल्यावस्थेत असल्यापासून प्रारंभ केला पाहिजे; कारण ही मुलेच पुढे जाऊन राष्ट्रासाठी कार्य करणारी होणार आहेत. हिंदूंच्या देवतांना केवळ आशीर्वाद देणारे हात नसून त्यांच्या हातात शस्त्रेही आहेत. त्यामुळे हिंदूंनीही उपासनेसमवेत शारीरिक बळही जोपासणे अत्यावश्यक आहे. आपल्यावर ज्या प्रकारे आक्रमण होते, त्याचा प्रतिकार त्याच मार्गाने हिंदूंनी केला पाहिजे. ‘सनातन प्रभात’ नेहमीच वस्तूनिष्ठ वार्तांकन करते. त्यामुळे योग्य ती घटना वाचकांपर्यंत पोचण्यास साहाय्य होते. ‘सनातन प्रभात’, तसेच ‘सनातन संस्था’ यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली, तर त्याचे फळ निश्चित मिळते, हे मी स्वत: अनुभवलेले आहे. त्यामुळे हिंदूंनी प्रतिदिन साधना केली, तर यश निश्चित आहे !

दैनिक उघडल्यावर प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचले जातात. हे विचार वाचून प्रत्यक्ष कृती केल्याचा लाभ मला झाला. आज राज्यकर्त्यांनी लहान मुलांवर संस्कार होण्यासाठी त्यांना शालेय अभ्यासक्रमातही गीता शिकवणे अत्यावश्यक आहे. असे केल्यास त्यांना लहानपणापासूनच अध्यात्म-धर्म यांचे संस्कार होतील. अन्य धर्मीय ज्याप्रमाणे प्रतिदिन त्यांच्या धर्माचे पालन करतांना कुठेही कचरत नाहीत, त्याचप्रमाणे हिंदूंनीही प्रतिदिन उपासना करतांना कुठेही मागे रहाता कामा नये.

समाजात साधनेचे बीजारोपण करत हिंदु राष्ट्राशी वैचारिक बांधीलकी जोपासणारे एकमेव दैनिक ! – अजय केळकर, विशेष वरिष्ठ प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’

श्री. अजय केळकर

आज केवळ भारतात नाही, तर जागतिक पातळीवर हिंदु राष्ट्राचीच चर्चा आहे. कुंभमेळ्यातही हिंदु राष्ट्राचा उद्घोष होत आहे. २५ वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ असा शब्द उच्चारणे, हा जणू अघोषित गुन्हा होता. अशा काळात ‘ईश्‍वरी राज्य’, ‘हिंदु राष्ट्र’, हे शब्द समाजात ‘सनातन प्रभात’ने रूढ केले. आरंभीपासून हिंदु राष्ट्राशी वैचारिक बांधीलकी जोपासली. समाजात साधनेचे बीजारोपण करत केवळ वृत्त न देता समाजाला योग्य दृष्टीकोन दिला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदुहिताच्या आंदोलनांना ‘सनातन प्रभात’कडून नेहमीच वैचारिक बळ पुरवले गेले. ‘लव्ह जिहाद’, बांगलादेशी घुसखोरी यांसह हिंदु धर्म, राष्ट्र यांवर आघात करणार्‍या प्रत्येक विषयाला वाचा फोडून ती सूत्रे तडीस नेण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे प्रयत्न नेहमीच राहिले आहेत.

उपस्थित मान्यवर

१. ‘भारत स्वाभिमान ट्रस्ट’चे जिल्हासंघटन मंत्री श्री. विनय साने
२. श्री साईमंदिर, कोतवडेचे श्री. शरद वारेकर
३. ‘श्रीनिर्माण’चे मालक श्री. दिनेश गवंडे
४. औद्योगिक वसाहत, रत्नागिरी येथील ‘विश्वेश्वर टिंबर इंडस्ट्रिज’चे मालक श्री. गोपाळभाई पटेल

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी सोहळा उपस्थिती

‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे हृदयस्पर्शी मनोगत !

‘सनातन प्रभात’ हे धर्मपरंपरा, धर्माचरण, संस्कृती यांचा प्रसार, प्रचार करणारे ध्येयनिष्ठ दैनिक ! – अधिवक्ता पद्याकर जोशी, रत्नागिरी

अधिवक्ता श्री. पद्याकर जोशी

मी दैनिक ‘सनातन प्रभात’ची आवृत्ती चालू झाल्यापासून त्याचा नियमित वाचक आहे. धर्मपरंपरा, धर्माचरण, संस्कृती यांचा प्रसार, प्रचार करणार्‍या या ध्येयनिष्ठ दैनिकाचा आज रौप्य महोत्सवी सोहळा होत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या दैनिकाचा पाया हा स्वच्छ, शुद्ध आणि धार्मिकतेचा असल्याने आज ‘सनातन प्रभात’ रोपट्याचा वटवृक्ष झालेला दिसत आहे.

‘सनातन प्रभात’वाचून गुणसंवर्धन आणि व्यक्तीमत्व विकास होतो ! – सौ. प्रतीक्षा रसाळ, देवरुख

सौ. प्रतीक्षा रसाळ

‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून झालेल्या चुका, तसेच त्या संदर्भात घेण्यात येणारे प्रायश्चित्त यांविषयी चौकटी यायच्या, याचा मी माझ्यात पालट करण्याच्या दृष्टीने लाभ करून घेतला. या चौकटी वाचून गुणसंवर्धन आणि व्यक्तीमत्त्व विकास होऊन त्याचा मला कार्यालयीन जीवनातही लाभ झाला. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा विविध देवस्थाने, देवळे यांचा भेटी दिल्याचा जो सविस्तर वृत्तांत दैनिकात प्रसिद्ध होतो. त्यामुळे तेथे प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखी माहिती मिळते. मी प्रत्यक्ष अयोध्या येथील श्रीराममंदिर अजून पाहिले नाही; मात्र त्या संदर्भातील वृत्तांत वाचून तेथे प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखे समाधान मिळाले.

‘सनातन प्रभात’चे धर्मजागृती, हिंदूसंघटन यांचे कार्य आर्थिक हानी सोसूनही अव्याहतपणे चालू ! – प्रकाश काळे, चिपळूण

श्री. प्रकाश काळे

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य एवढे मोठे आहे, की त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी दैनिक चालू केले. ‘सनातन प्रभात’चे धर्मजागृती, हिंदूसंघटन यांचे कार्य आर्थिक हानी सोसूनही अव्याहतपणे चालू आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ कोणतेही भडक वृत्तांकन करत नाही. ‘सनातन प्रभात’ची भाषा काही वाचकांना क्लिष्ट वाटते; मात्र ती क्लिष्ट नसून शुद्ध असते. वाचनात सातत्य ठेवल्यास तेही समजणे सोपे जाते.

विशेष प्रतिक्रिया

सण-उत्सव का आणि कसे साजरे करावेत ? याची अध्यात्मशास्त्रीय माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’मधून मिळते ! – सौ. उमा अनिल देवळे

दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रत्येक सण-उत्सव का आणि कसे साजरे करावेत ? याची अध्यात्मशास्त्रीय परिपूर्ण माहिती मिळते. याचा आताच्या वैज्ञानिकदृष्ट्या विचारप्रवण असलेल्या तरुण पिढीला फार लाभ होतो. आम्हीही सर्वांनी नामजप करण्याची एक वेळ ठरवून घेतली असून ती वेळ पाळण्याचा घरातील प्रत्येक जण प्रयत्न करतो.

क्षणचित्रे

१. सभागृहात येतांना नमस्काराच्या मुद्रेतील ‘सनातन प्रभात’मधील ‘समर्थ’ या बोधचित्राचा ‘कटआऊट’ लावण्यात आला होता. हा ‘समर्थ’ सर्वांना जाज्वल्य आणि धर्मनिष्ठ पत्रकारितेची ग्वाही देत होता.

२. ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होण्यासाठी एका झाडाच्या पानावर ‘क्यू.आर्.कोड.’ लावण्यात आले होते. या आगळ्या-वेगळ्या संकल्पनेचा उपयोग करत अनेक जण दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले.

३. ‘सनातन प्रभात’विषयीच्या ‘आपण माझ्याविषयी काय सांगाल ?’ या वैशिष्ट्यपूर्ण फलकावर अनेकांनी त्यांचे अभिप्राय लिहिले.

४. या सोहळ्यासाठी उद्योजक श्री. अनिल देवळे यांच्या पत्नी सौ. उमा, तसेच मुले श्री. सौरभ आणि श्री. राजीव हेही आर्वजून उपस्थित होते.