प्रयागराज कुंभपर्व २०२५
मौनी अमावास्येच्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेच्या संकटाचा सामना करण्याचे श्रेय संतांना !

प्रयागराज – मौनी अमावास्येच्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेत संतांनी जे धैर्य दाखवले, त्यापुढे सनातन धर्माच्या विरोधकांचा पराभव झाला, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येते केले. महाकुंभक्षेत्रातील सेक्टर २२ मध्ये संतोष दास सतुआ बाबा आणि स्वामी राम कमलाचार्य या संतांच्या पट्टाभिषेकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांनी दोन्ही संतांना जगद्गुरू पदासाठी नामांकित केले. राम कमलाचार्य महाराज यांना यापुढे ‘जगद्गुरू स्वामी राम कमलाचार्य महाराज’ आणि संतोष दास यांना ‘जगद्गुरू विष्णु स्वामी संतोष दास महाराज सतुआ बाबा’ म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांनी केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी संतांचे आशीर्वाद घेतले आणि नवनियुक्त जगद्गुरूंना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘मौनी अमावास्येच्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेच्या प्रसंगात संतांनी अपार धैर्य दाखवले. काही पुण्यात्म्यांनी अपघातात प्राण गमावले; पण त्या परिस्थितीत आमचे संत पालकाच्या भूमिकेत दिसले. जेव्हा कुटुंबावर संकट येते, तेव्हा कुटुंबप्रमुख घाबरत नाही, तसेच या संतांनीही ठामपणे उभे राहून संकटाचा सामना करत सगळ्यांना मार्गदर्शन केले. प्रतिकुल परिस्थितीतही धैर्याने आव्हानांना तोंड देत हे अभियान पुढे न्यायचे आहे; कारण सनातन धर्म हाच मानवधर्म आहे. सनातन राहील, तर मानवधर्म टिकेल. तुम्ही सर्व संत सनातन धर्माचे आधारस्तंभ आहात. सनातन धर्माच्या विरोधकांनी प्रयत्न केला की, संतांचे धैर्य खचावे आणि त्यानंतर हिंदु धर्माचे जगभर हसे व्हावे; पण संतांमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत.’’
१९ दिवीसांत ३२ कोटींहून अधिक भाविकांनी केले गंगास्नान !संतांच्या प्रेरणेमुळे महाकुंभपर्व चालू झाल्यापासून १९ दिवसांत ३२ कोटींहून अधिक भाविकांनी गंगास्नान करून पुण्य प्राप्त केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. |
सनातन धर्माविरुद्धच्या षड्यंत्रापासून सावध रहा ! – मुख्यमंत्रीकाही लोक समाजाला गोंधळात टाकून सनातन धर्माविरुद्ध षड्यंत्र रचत आहेत. रामजन्मभूमीच्या हिंदूंच्या आंदोलनापासून आजपर्यंत त्यांचे वर्तन आणि हेतू उघड झाला आहे. अशा लोकांपासून सावध राहून सनातन धर्माच्या आदर्शांप्रमाणे संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे जायला हवे. जोपर्यंत संतांचा सन्मान आहे, तोपर्यंत सनातन धर्माची कुठलीही हानी होऊ शकत नाही. |