महाकुंभमेळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

महाकुंभातील काही घडामोडी या बातम्यांमधून कळतात, तर काही घडामोडींची माहिती मिळत नाही. अशा घडामोडींशी अवगत करण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करत आहोत.

१. साधूंचे भव्य मंडप

कुंभमेळ्यात शंकराचार्य, आखाडे, साधू-संत आणि गंगा स्नान हे केंद्रबिंदू आहेत. महाकुंभमेळ्यात आखाड्यांसह अनेक साधू-संत, संप्रदाय यांचे भव्य मंडप आणि अनुरूप कक्ष उभारलेले लक्षात आले. जेवढा एखाद्या पीठाधीश्वर, संत यांचा नावलौकिक मोठा त्यानुसार त्यांच्या मंडपांची भव्यता आहे. ज्यांची आर्थिक स्थिती पुष्कळ चांगली आहे, ज्यांना मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात, त्यांचे मंडप, तेथे रहाण्याची व्यवस्था, सुविधा अत्याधुनिक आहेत. कुंभमेळ्याची विभागणी सेक्टरमध्ये केलेली असते. गंगानदीच्या एका तिरावर काही सेक्टर असतात आणि काही सेक्टर गंगानदीच्या प्रवाहाच्या पलीकडील बाजूला असतात. नागा साधूंचे आखाडे, चारही पीठाचे शंकराचार्य यांचे मंडप हे सेक्टर १७ ते १९ येथे आहेत, म्हणजे हा भाग मोक्याचा आहे. त्यातही सेक्टर क्रमांक १९ हा सर्वांत महत्त्वाचा आहे. येथेच आखाडे आहेत. आखाड्यांचा परिसरही मोठा असतो, म्हणजे काही एकरमध्ये असतो. या आखाड्यांमध्ये मढी असतात. मढी म्हणजे आखाड्यांच्या अंतर्गत असलेल्या संप्रदायांची कार्यालयेच जणू ! आखाड्यांशी संबंधित काही संतांचे संप्रदाय आता एवढे वाढले आहेत की, त्यांना स्वतंत्र जागा आणि मंडप लागतो.

२. आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि

आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि

सनातन संस्थेचा एक मंडप याच सेक्टरमध्ये मोरी मुक्ती मार्ग येथे अगदी प्रारंभीच आहे. या सेक्टरमध्ये सेक्टर क्रमांक १८ येथे जुना आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि यांचा मंडप आहे. हा मंडप ३० एकरहून अधिक जागेत व्यापला आहे. यामध्ये स्वामी अवधेशानंद गिरि यांच्या प्रवचनाला एकूण २ लाख लोक बसू शकतील एवढा प्रवचन मंडप आहे. त्यांची संस्था ‘प्रभु प्रेमी संघ’ यांच्या या मंडपात एक रुग्णालय, स्वयंपाकगृह आणि अन्य अत्याधुनिक सुविधा आहेत. या मंडपाच्या उभारणीला कोट्यवधी रुपयांचा व्यय आला आहे. मंडपात प्रवेश केल्यावर दिसणारी आद्यशंकराचार्य यांची मूर्ती शुद्ध तांब्यापासून सिद्ध केली आहे. स्वामी अवधेशानंद गिरि हे नागा साधू बनण्याची इच्छा असलेले भक्त, साधक यांना दीक्षा देतात. वास्तविक आखाड्यांमध्ये शंकराचार्य हे पद मोठे असले, तरी आखाड्यांचेही प्रमुख असतात. तरीही स्वामी अवधेशानंद गिरि प्रमुख असलेला जुना आखाडा हा नावाप्रमाणे सर्वांत जुना असल्याने आणि लाखो नागा साधूंचे ते नेतृत्व करत असल्याने त्यांच्या नावाची चर्चा कुंभमेळ्यात आहे.

३. आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरि

आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरि

कुंभमेळ्यातील सेक्टर ९ येथे भव्य मंडप असलेले दुसरे एक नाव म्हणजे निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरि ! यांचाही मंडप (छावणी) भव्य-दिव्य आहे. एखाद्या राजप्रसादाला अथवा राजाच्या महालाला लाजवेल अशी त्याची रचना, भव्यता आणि सौंदर्य आहे. स्वामी कैलाशानंद गिरि हे सर्वाधिक चर्चेत आले, जेव्हा त्यांनी ‘ॲपल’ या जगप्रसिद्ध आस्थापनाचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांना महाकुंभमेळ्यात दीक्षा दिली आणि त्यांचे नामकरण केले. स्वामी कैलाशानंद गिरि यांच्याकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, प्रसिद्ध खेळाडू, राजकीय नेते, मंत्री, न्यायाधीश यांचे येणे-जाणे असते. त्यांच्या कुटीच्या बाहेर नेहमी बातम्या मिळण्यासाठी पत्रकार उपस्थित असतात. त्यांच्याकडे चाललेल्या अन्नछत्रात प्रतिदिन काही सहस्र लोक महाप्रसाद ग्रहण करतात. आर्थिक साहाय्यासाठी त्यांच्याकडे उद्योगपती अंबानींसारखे मोठे देणगीदार आहेत.

४. अनेक विदेशी महंत आणि महामंडलेश्वर यांचे दर्शन

या वर्षी महंत, महामंडलेश्वर अशा उपाध्या धारण करणारे अनेक विदेशी साधूंचे दर्शन आखाड्यात झाले. यामध्ये प्रामुख्याने प.पू. पायलटबाबा यांच्यानंतर त्यांच्या गादीवर विराजमान झालेल्या जपान येथील योगमाता केको आई यांचे नाव चर्चेत आहे. अन्य एक स्त्री आणि पुरुष महामंडलेश्वर प.पू. पायलटबाबा यांच्या संप्रदायातच आहेत. त्यांचे स्वतंत्र तंबू महाकुंभनगरीत आहेत.

५. ‘आश्रमाऐवजी स्वयंसेवी संस्था काढल्यास लाभ होतो’, असे सांगणारे एक साधू !

श्री. यज्ञेश सावंत

आश्रम चालवण्यात येणारी अडचण सांगतांना एक साधू म्हणाले की, संप्रदायाच्या आश्रमांना सरकार काही अनुदान वा साहाय्य करत नाही. परिणामी आश्रम चालवण्यात अडचणी येतात. त्याऐवजी स्वयंसेवी संस्था काढल्यास सरकारच्या सवलती आणि सुविधा लागू होतात. परिणामी संतांना आता आश्रमाच्या ऐवजी स्वयंसेवी संस्था काढून संप्रदाय आणि सांप्रदायिक यांची व्यवस्था करावी लागते.

याच साधूंनी ‘कुंभमेळ्यात केवळ धार्मिक संस्था, संप्रदाय यांनाच जागा दिल्या पाहिजेत. सामाजिक कार्य करणार्‍यांसाठी नको. अन्यथा कुंभमेळ्याची धार्मिकता न्यून होऊ शकते’, असे सांगितले.

६. यू ट्यूबर्सनी मांडला उच्छाद !

या वर्षी कुंभमेळ्यात यू ट्यूबर्सनी (यू ट्यूब या सामाजिक माध्यमांवर विविध विषयांचे व्हिडिओ सिद्ध करून ते प्रसिद्ध करणारे.) उच्छाद मांडला आहे. हे यू ट्यूबर त्यांच्या व्हिडिओज्ना चांगली प्रसिद्ध मिळावी, त्यांचे यू ट्यूब चॅनेल प्रसिद्ध व्हावे, यासाठी महाकुंभमेळ्यात फिरून संतांना उलटसुलट प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. एका साधूंना एका यू ट्यूबरने वेगळा प्रश्न विचारल्यावर साधूंनी त्याला चिमट्याने मारत हाकलले, तर दुसर्‍याच्या कानशिलात लगावली. या साधूंनी ‘हे लोक मला बेजार करत आहेत’, असे सांगितले. तरी सामाजिक माध्यमांवर लोक ‘साधूंनी संयम बाळगला पाहिजे’, अशी अपेक्षा व्यक्त करतात. एका यू ट्यूबर मुलीने साधूंना चमत्कार दाखवण्याविषयी तावातावाने वाद घातला आणि साधूंना आव्हान दिले. साधूंशी कसे बोलायचे ? कसे वागायचे ? याचे भान नसलेल्या या मुलीला सामाजिक माध्यमावर हिंदूंनी खडे बोल सुनावले.

७. ‘महाकुंभमेळ्यात सर्वांत सुंदर साध्वी कोण ?’,अशा बातम्या देणारे उथळ पत्रकार !

महाकुंभमेळ्यात काही विकृत पत्रकारांनी कोणतीही नीतीमत्ता न बाळगता, म्हणजे विकृतीची परिसीमा गाठत ‘कुंभमेळ्यात सर्वांत सुंदर साध्वी हर्षा आहेत. त्यांचे सामाजिक माध्यमांवर किती फॉलोअर्स (अनुयायी) आहेत ?’, अशा बातम्या प्रसारित केल्या. त्यामुळे त्यांना कुंभमेळ्यात टीकेचे धनी व्हावे लागले. त्यांनी ‘मी अजून साध्वी बनली नसून प्रक्रियेत आहे’, असे सांगितले, तसेच त्यांच्या वडिलांनाही याविषयी स्पष्टीकरण द्यावे लागले. या साध्वीचे पूर्वायुष्यातील तोकड्या कपड्यांतील आणि वेगळ्या वेषभूषेतील छायाचित्रे बातम्यांमध्ये अन् संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. परिणामी या साध्वीला कुंभमेळ्यातून काढता पाय घ्यावा लागला.

दुसर्‍या एका घटनेत विविध माळा विकणार्‍या एका फेरीवाल्या मुलीची छायाचित्रे सुंदर फेरीवाली म्हणून प्रसारित झाली. त्यामुळे लगोलग माध्यमे आणि यू ट्यूबर यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. तिची छायाचित्रे आणि तिच्या मुलाखती घेण्यासाठी यू ट्यूबर्सनी सीमा ओलांडल्या. परिणामी तिला तोंड लपवून व्यवसाय करण्याची वेळ आली. नातेवाईक आणि यू ट्यूबर यांच्यात हाणामारी झाली. परिणामी तिला तिच्या मध्यप्रदेशातील मूळ गावी पळून जावे लागले. तिचा व्यवसायच बंद पडला.

‘भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)’ येथून पदवीधर झालेले आणि सध्या साधू बनलेले अभय सिंह यांना महाकुंभात पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. या ‘इंजिनीयर बाबा’चा पूर्वेइतिहास माध्यमांनी बातम्यांमध्ये मांडला. यामध्ये त्यांच्या घरातील वादविवाद, कुटुंबियांशी दुरावा अशा बातम्या रंगवल्या. परिणामी शिस्तीचे कारण देत त्यांना त्यांच्या आखाड्यातून निष्कासित करण्यात आले.

८. हिंदुद्वेष्टे मुलायमसिंह यांच्या नावाचा मंडप

हिंदुद्वेष्टे, कारसेवकांवर गोळ्या चालवणारे आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुंभक्षेत्री त्यांचा पुतळा उभा करण्यासह एका संस्थेने त्यांच्या नावाने मंडप उभा केला आहे. त्याविषयी कुंभमेळ्यात येणारे हिंदूही आश्चर्य व्यक्त करत आहेत. (२२.१.२०२५)

– श्री. यज्ञेश सावंत, कुंभनगरी, प्रयागराज, उत्तरप्रदेश.

भाविकांच्या महाप्रसादाची भावपूर्ण व्यवस्था करणारा ‘ओ३म् दीनदयाल आश्रम’ !


महाकुंभनगरी प्रयागराज येथे अनेक संस्था, संप्रदाय या भाविकांसाठी विनामूल्य अन्नछत्र चालवत आहेत. यामध्ये कुणी भाविकांना चहा आणि अल्पाहाराची व्यवस्था करत आहेत. काही संप्रदाय भाविकांना दोन वेळच्या महाप्रसादाची व्यवस्था करत आहेत. यामध्ये पंजाबमधील संस्था आहे ती म्हणजे ‘ओ३म् दीनदयाल आश्रम’. येथे भाविकांना महाप्रसाद गरम मिळेल, हे पाहिलेच जाते. त्यासह प्रत्येक पदार्थ वाढतांना तो नामजप करून वाढला जातो. त्यातील काही उल्लेख सुंदर आहेत. ‘डालराम’, ‘चावलराम’, ‘पुरीराम’, ‘सब्जीराम’, ‘प्रसादा (पोळी)’, ‘जलराम’, ‘वाहेगुरु सब्जी’ असा उल्लेख केला जातो. भाविकांना महाप्रसाद वाढल्यानंतर देवतांच्या नामजपाचा जयघोष करून मगच ग्रहण केला जातो. सनातन संस्थेच्या साधकांचे आचरण, सेवा हे पाहून ते साधकांच्या महाप्रसादाची व्यवस्था, तसेच साधकांना महाप्रसादात काही हवे-नको, हे ते अगदी जातीने लक्ष देऊन पहातात. त्यांनी साधकांना महाप्रसादाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत आणि त्या वेळेत ते महाप्रसाद सिद्ध करून ठेवतातच. शेवटचा साधक महाप्रसाद करून उठेपर्यंत ते त्याला काही हवे-नको, हे आर्वजून पहातात. या व्यतिरिक्त सकाळी आणि सायंकाळी ते त्यांच्या मंडपाबाहेर प्रसादाचा कक्ष लावून अखंड प्रसाद वितरण करतात, तर काही वेळा दिवसभर ये-जा करणार्‍या भाविकांना फळे वितरित करत असतात.

– श्री. यज्ञेश सावंत