अल्पवयीन गुन्हेगारीची वयोमर्यादा १८ ऐवजी १४ वर्षे करण्याचे विचाराधीन ! – अजित पवारांचे सुतोवाच !

उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती – अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने अल्पवयीन गुन्हेगारीची वयोमर्यादा १८ ऐवजी १४ वर्षे करण्याचे विचाराधीन असल्याचे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री, तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. १३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. या वयोगटातील मुलांकडून चुकीच्या गोष्टी करवून घेतल्या जातात; मात्र गुन्हा घडल्यानंतर ही मुले अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास मर्यादा येतात. त्यांना कारागृहातही टाकता येत नाही. त्यामुळे ही वयोमर्यादा कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे. १४ वर्षांच्या मुलाचा गुन्ह्यामध्ये सहभाग असेल, तर या वयोगटातील मुलांनाही कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

मुले गुन्हेगारीकडे वळणारच नाहीत यासाठी बालवयापासून त्यांना मूल्यशिक्षण आणि धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !