प्रयागराज कुंभपर्व २०२५
शांभवी पीठाधीश्वर श्री स्वामी आनंद स्वरूप महाराज
|

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध करतांना आम्ही केवळ धर्माला आधार मानले आहे. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जशी राज्यव्यवस्था आहे, ज्या राज्यांमध्ये शासनव्यवस्था चांगली होती, त्यांचा संदर्भ घेण्यात आला आहे. नागरिकांना रामराज्याची अनुभूती मिळेल, अशी हिंदु राष्ट्राची राज्यघटना सिद्ध करण्यात आली आहे, असे प्रतिपादन शांभवी पीठाधीश्वर श्री स्वामी आनंद स्वरूपजी महाराज यांनी केले. वसंत पंचमीच्या दिवशी राज्यघटनेचे हे प्रारूप सर्वांसमोर सर्वांसमोर येईल, असे सांगितले.
ते पुढे म्हणाले की,
१. सर्व मुख्य आचार्य यांना ५०० पानांची हिंदु राष्ट्राची राज्यघटना आणि त्याचे संक्षिप्त प्रारूप दिले आहे. सर्वांच्या अनुमतीविना ते प्रसिद्ध केले जाऊ शकत नाही. या क्षेत्रातील तज्ञांना घेऊन आम्ही राज्यघटना सिद्ध केली आहे.
२. हे प्रारूप सर्वांनाच आवडले आहे. सर्वच साधू-संत, प्रमुख आचार्य यांना हिंदु राष्ट्र राज्यघटना पारित व्हायला हवी, असे वाटत आहे. आता केवळ प्रारूप आले आहे. वसंत पंचमीला पूर्ण राज्यघटना सर्वांसमोर येईल. त्यानंतर सर्वांची स्वाक्षरी घेऊन ते माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांना देण्यात येईल.
३. जितक्या डाव्या विचारसरणीच्या वृत्तवाहिन्या आहेत, त्यांनीसुद्धा हिंदु राष्ट्र राज्यघटनेच्या निर्मितीच्या बातम्या दिल्या आहेत. याचा अर्थ असा की, त्यांना हिंदु राष्ट्र होणार हेसुद्धा ठाऊक आहे. आम्हाला पहिल्यांदा असे वाटले की, वर्ष २०३५ पर्यंत हिंदु राष्ट्र साकार होईल; पण आता वर्ष २०३० मध्येच हिंदु राष्ट्र साकार होईल याची आम्हाला निश्चिती वाटते.
४. हिंदु राष्ट्रात सैन्य व्यवस्था जशी आहे, तशीच राहील. हे गणराज्य आहे, तसेच राहील. केवळ राज्यघटना पालटेल, शासनव्यवस्था पालटली जाईल आणि आपली राज्यघटना ही स्वदेशी असेल, देशाने बनवलेली असेल. भारतीय संस्कृतीमधील राज्यव्यवस्था जशी होती, त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्रातील राज्यव्यवस्था असेल.
हिंदु राष्ट्राच्या आमच्या प्रारूपाविषयी एका दैनिकाने जाहीर केलेली बातमी अयोग्य !हिंदु राष्ट्राच्या आमच्या प्रारूपाविषयी एका प्रतिष्ठित दैनिकाने जाहीर केलेली बातमी अयोग्य आहे. त्याने ही माहिती आमची अनुमती न घेता प्रसिद्ध केली आहे. वास्तविक राज्यघटनेच्या प्रारूपाविषयीची माहिती शंकराचार्य, संत यांच्याशी चर्चा करून अंतिम करायची होती; मात्र त्यापूर्वीच संबंधित दैनिकाने ही माहिती प्रसिद्ध करणे अयोग्य आहे. आम्ही त्यांना यापुढील माहिती आता न देण्याचे ठरवले आहे. |