साक्षीदाराच्‍या बोलण्‍यातील असत्‍य अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांच्‍याकडून उलटतपासणीत उघड !

कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरण !

कॉ. गोविंद पानसरे

कोल्‍हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरणात साक्षीदार मुकुंद कदम यांची उलटतपासणी चालू असतांना त्‍यांनी ‘मी या प्रकरणात एकही अधिवक्‍ता दिला नाही’, असे न्‍यायालयात सांगितले. प्रत्‍यक्षात या प्रकरणी २५ वकीलपत्रांवर ३०० हून अधिक अधिवक्‍त्‍यांची स्‍वाक्षरी असलेला अर्ज यापूर्वीच कदम यांनी न्‍यायालयात दिला असून तो अर्ज अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिला. या कागदपत्रांच्‍या संदर्भात विचारणा केल्‍यावर ‘त्‍यावर स्‍वाक्षरी केल्‍याचे मला आठवत नाही’, असे कदम यांनी न्‍यायालयात सांगितले. त्‍यामुळे कदम यांच्‍या साक्षीतील असत्‍यपणा अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी २९ जानेवारी या दिवशी उलटतपासणीत न्‍यायालयाच्‍या समोर उघड केला. कॉ. गोविंद पानसरे हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू आहे.

अधिवक्‍ता समीर पटवर्धन

सरकार पक्षाच्‍या वतीने कॉ. पानसरे हत्‍या प्रकरणातील एक फिर्यादी मुकुंद कदम यांची साक्ष न्‍यायालयात नोंदवण्‍यात आली असून बचाव पक्षाच्‍या वतीने कदम यांची उलटतपासणी चालू आहे. सरकार पक्षाच्‍या वतीने अधिवक्‍ता शिवाजीराव राणे उपस्‍थित होते.

मुकुंद कदम, मेघा पानसरे हे कॉ. पानसरे यांच्‍या स्‍मृतीदिनाच्‍या निमित्ताने नेहमी ‘खर्‍या खुन्‍यांना पकडा’, म्‍हणून आंदोलन करतात, मग ‘आता पकडलेले संशयित हे खरे आरोपी नाहीत’, असे तुमचे म्‍हणणे आहे का ?’  असा प्रश्‍न अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी साक्षीदार कदम यांना विचारला. अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘कॉ. पानसरे यांना विविध घटकांकडून धमक्‍या येत होत्‍या. हे मुकुंद कदम यांना माहिती असतांना त्‍यांनी हे त्‍यांच्‍या जबाबात कधीही पोलिसांना सांगितले नाही. एकीकडे मुकुंद कदम हे ‘कॉ. पानसरे यांना सनातन्‍यांचा विरोध आहे’, असे सांगून ‘गोवा येथे बाँबस्‍फोटात त्‍यांचा हात आहे’, असे म्‍हणतात, तर या खटल्‍यात ‘सनातन संस्‍थेचे साधक वर्ष २०१३ मध्‍ये निर्दोष सुटले, हे मला माहिती असते, तर मी त्‍यांचे नाव घेतले नसते’, असेही म्‍हणतात. त्‍यामुळे कदम यांच्‍या जबाबात विसंगती आहे, तसेच त्‍यांच्‍या जबाबातील अनेक गोष्‍टी या निश्‍चिती न केलेल्‍या, तसेच त्‍या संदर्भात कोणताही ठोस पुराव नसलेल्‍या आहेत, हे अधिवक्‍ता वीरेंद्र यांनी न्‍यायालयात उलटतपासणीत उघड केले.

या वेळी अधिवक्‍ता डी.एम्. लटके यांनी मुकुंद कदम यांच्‍या गाडीचा पोलिसांनी पंचनामा केलेला नाही, फिर्याद देतांना त्‍यांनी गाडीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, कदम यांच्‍या पत्नीचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला नाही, हे उलटतपासणीत निदर्शनास आणून दिले.

अधिवक्‍ता ए.जी. बडवे यांनी उलटतपासणीत एकीकडे मुकुंद कदम हे ‘कॉ. पानसरे विविध संघटनांमध्‍ये काम करत होते’, असे सांगतात, तर दुसरीकडे त्‍यांना एकाही संघटनेचे नाव सांगता येत नाही, हेही न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणून दिले. या वेळी ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ता अनिल रुईकर, अधिवक्‍त्‍या प्रीती पाटील उपस्‍थित होत्‍या. या खटल्‍याची पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला होणार आहे.