भारत आणि नेपाळसह संपूर्ण जगात हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ नेते शंकर खराल, नेपाळ

ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ नेते शंकर खराल

प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता.) – भारत आणि नेपाळसह संपूर्ण जगात हिंदु राष्ट्राची स्थापना करूया. हिंदू हा वाघ आहे, तो जागा होण्याची वेळ आली आहे. तो जागा झाला की, हिंदु राष्ट्र निर्माण होईल, असे प्रतिपादन नेपाळ येथील ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. शंकर खराल यांनी येथे केले.

२८ जानेवारी या दिवशी श्री. शंकर खराल यांनी आपल्या सहकार्यांसह कुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीच्या ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखात घेतली. या वेळी ते बोलत होते. तत्पूर्वी प्रदर्शन पाहिल्यानंतर श्री. खराल यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची भेट घेऊन विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी श्री. खराल यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा सन्मान केला.

विविध प्रश्‍नांना उत्तर देतांना श्री. शंकर खराल म्हणाले की,

१. महाराष्ट्र्रात गोहत्याबंदी आहे, त्याविषयी मी सरकारचे अभिनंदन करतो. आता उत्तराखंडामध्येही गोहत्याबंदी लवकरच होईल आणि संपूर्ण भारतामध्ये गोहत्या बंदी कायदा लागू होईल.

२. सध्या आपण इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे चालत आहोत. खरे तर आपण हिंदु दिनदर्शिकेप्रमाणे चालले पाहिजे. तिथी, अमावस्या, पौर्णिमा ही आपली कालगणना आहे.

३. राष्ट्राला सीमा असते, धर्माला नाही. हिंदू जगात कुठेही गेला, तर ते आपलेच आहेत, असे वाटते. तीर्थक्षेत्र हे कोणत्यातरी देशाचे नसते, तर ते मानवकल्याणाचे असते.

४. त्याचप्रमाणे हा कुंभमेळाही आपलाच आहे. यासाठी नेपाळमधून अनेक हिंदू या कुंभक्षेत्री येत आहेत. पवित्र नदीमध्ये स्नान करत आहेत. या स्नानातून मन आणि बुद्धी यांवरील आवरण (मळ) निघून जाते. मनाची शुद्धी होते, पुण्य लाभते.

५. नेपाळ हिंदु राष्ट्र होते; परंतु काही विदेशी देशांनी षड्यंत्र केले. वर्ष २०१८ मध्ये जनगणना झाली, तेव्हा ८१ टक्के हिंदू होते. नेपाळची वाटचाल हिंदु राष्ट्राच्या दिशेने आहे.

६. नेपाळ येथील जनता हिंदु राष्ट्राची मागणी करत आहे. त्यांना हिंदु राष्ट्र झाले पाहिजे, असे त्यांना वाटते. त्यांनी हिंदु राष्ट्राचा कधीही विरोध केला नाही कि निधर्मी राष्ट्राची मागणीही केली नव्हती. हिंदूंच्या अज्ञानाचा अपलाभ घेत ख्रिस्त्यांनी प्रभाव टाकून त्यांचे धर्मांतरण केले आहे.