हिंदु सेवा साहाय्य समितीची मागणी
नंदुरबार – राष्ट्रभक्तीचे स्फुलिंग ‘वन्दे मातरम्’ या गीताने जागृत होते. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ कळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रगान शाळा- महाविद्यालय, शैक्षणिक संस्था याठिकाणी प्रतिदिन राष्ट्र गीतासोबत, तर शासकीय- निम शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्रदिन या दिवशी हे गाणे अनिवार्य करावे, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून, तर आमदार डॉ. विजयकुमार गावित यांना समक्ष भेटून दिले. या वेळी आमदार डॉ. गावित यांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रगीत बंधनकारक होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार’, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
निवेदनात म्हटले आहे की,…
१. इ.स.१८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘वन्दे मातरम्’ हे गीत लिहिले. वर्ष १८९६ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम राजकीय संदर्भात गायलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली.
२. स्वातंत्र्यसंग्रामात अनेक क्रांतीकारक ‘वन्दे मातरम्’ची घोषणा देत हुतात्मा झाले.
३. २४ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय संविधान सभेने ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. याप्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले होते, ‘जन-गण-मन’ या भारताच्या राष्ट्रगीताच्या समवेत या गाण्याचाही सन्मान केला पाहिजे.’’
निवेदन देतांना हिंदु सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, प्रवीण नांदेडकर, संदीप राजपूत, पंकज डाबी, गणेश राजपूत, पंकज मुसळे आदी उपस्थित होते.