

‘किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्याकडे गुरुपौर्णिमा उत्सवाला जाण्याची संधी मला मिळाली. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काही ग्रंथ आणि सुवचनांचा कापडी फलक भेट दिला. ही भेट मी गोवा येथे परात्पर गुरु डॉक्टरांपर्यंत पोचवली. परात्पर गुरु डॉक्टरांनी ते ग्रंथ स्वतःच्या हातात घेऊन त्यातून ‘कोणती अनुभूती येते?’, याचा अभ्यास केला. त्या वेळी त्यांचा भाव जागृत झाला. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी सुवचनांचा कापडी फलक प्रथम हातात घेतला आणि त्यानंतर स्वतःच्या पाठीवर शाल पांघरल्याप्रमाणे तो फलक पांघरला. तेव्हा त्यांना ध्यान लागल्याची अनुभूती आली. या अनुभूती परात्पर गुरु डॉक्टरांनी मला प.पू. देवबाबा यांना कळवण्यास सांगितल्या. या अनुभूती प.पू. देवबाबा यांना सांगितल्यावर ते ‘धन्यवाद’, असे म्हणाले.

प.पू. देवबाबा यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना जशा भेटवस्तू दिल्या होत्या, तशाच त्यांनी मलाही दिल्या होत्या; परंतु माझ्या मनात भेटवस्तूंची अनुभूती घेण्याचा विचार आला नाही. त्यानंतर मीही त्या भेटवस्तूद्वारे ‘काही अनुभूती येतात का ?’ याचा अभ्यास केला. मला त्या ग्रंथांतून चैतन्याची आणि सुवचने असलेल्या कापडी फलकाद्वारे ध्यान लागल्याची अनुभूती आली. त्यातून हे लक्षात आले की, ‘संतांनी दिलेल्या भेटवस्तूंची अनुभूती घेतल्याने त्यातून साधकाला चैतन्य मिळते, तसेच त्याचे महत्त्वही स्वतःच्या लक्षात येण्यास साहाय्य होते.’ हे सर्वकाही परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःच्या कृतीतून मला शिकवले.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२३)