Waqf Amendment Bill : संयुक्त संसदीय समितीकडून वक्फ सुधारणा विधेयक संमत

सत्ताधार्‍यांच्या १४ सुधारणा संमत, तर विरोधकांच्या ४४ सुधारणा फेटाळल्या

संयुक्त संसदीय समिती

नवी देहली – वक्फ सुधारणा विधेयक २०२४ च्या संदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या २७ जानेवारीला झालेल्या बैठकीत सत्ताधार्‍यांच्या १४ सुधारणा संमत करण्यात आल्या, तर विरोधी पक्षांच्या ४४ सुधारणा फेटाळण्यात आल्या. याविषयी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाले की, या विधेयकात ज्या सुधारणा संमत करण्यात आल्या, त्यामुळे हे विधेयक अधिक चांगले होऊ शकेल. यातून गरीब आणि पसमांदा (मागासवर्गीय) मुसलमानांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा सरकारचा हेतू साध्य होईल.

१. जगदंबिका पाल यांनी संमत झालेल्या सुधारणांपैकी काही सुधारणांचा उल्लेख केला. आधी वक्फ भूमीच्या मालकीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा सर्वाधिकार जिल्हाधिकार्‍यांना होता. आता राज्य सरकारकडून नेमलेल्या व्यक्तीकडे हे अधिकार असतील. ती व्यक्ती आयुक्त किंवा सचिवही असू शकते. आधी वक्फ बोर्डावर दोनच सदस्य होते. सरकारकडून दोनऐवजी ३ सदस्य असावेत असे सुचवण्यात आले. यामध्ये इस्लामच्या एका अभ्यासकाचाही समावेश असेल.

२. संयुक्त संसदीय समिती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी तिचा अहवाल सादर करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून ४ एप्रिलपर्यंत चालणार आहे.