कुंभमेळ्यात देश-विदेशातील कोट्यवधी भाविक पर्वस्नान आणि अमृतस्नान यांसाठी येत आहेत. या दैवी वातावरणाचा आणि देवनदी गंगेच्या पवित्र खोर्यात वास्तव्याचा अनुभव घेण्यासाठी येत आहेत. या दैवी वातावरणाचा खर्या अर्थाने लाभ होण्यासाठी आणि भाविकांना धर्मज्ञान प्रदान करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची प्रदर्शने लावली आहेत.
सनातन संस्थेचा प्रदर्शन मंडप हा सेक्टर क्रमांक १९, मोरी मुक्ती मार्ग या मार्गावर प्रारंभीच आहे. या सेक्टरमध्येच जवळपास सर्वच आखाडे आहेत. त्यामुळे हा भाग नेहमीच गजबजलेला असतो आणि महत्त्वाचा आहे. सनातन संस्थेचे फलक आणि ग्रंथ, सात्त्विक वस्तू यांचे प्रदर्शन याच ठिकाणी प्रत्येक कुंभमेळ्याच्या कालावधीत असते. हे प्रदर्शन सर्वांत आधी उभे राहिले आहे. १२ जानेवारी या दिवशी महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. येथे भाविक आणि जिज्ञासू यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या ठिकाणी हिंदु धर्माभिमानी जुगल किशोर तिवारी या भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकार्यांनी ‘गंगा नदीचे महात्म्य’ या हिंदी ग्रंथाची मागणी त्यांच्या ‘नदी संवाद’ या कार्यक्रमात दर्शकांना वितरित करण्यासाठी केली.

या कक्षावर सर्वच भाषिक ग्रंथांचे वितरण अधिक आहे. या भाषांमध्ये बंगाली, गुजराती, इंग्रजी, कन्नड या भाषांतील ग्रंथांना चांगला प्रतिसाद आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन चालू असते. २४ जानेवारीपर्यंत १५ सहस्र २०० हून अधिक जिज्ञासूंनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे, तर ८०० हूनही अधिक अभिप्राय मिळाले आहेत. भाविक येथे लावलेल्या धर्मशिक्षण फलकांची छायाचित्रे काढून घेतात आणि त्याचे भ्रमणभाषवर ध्वनीचित्रीकरणही करतात.
प्रदर्शन चालू होण्याआधीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणारे सनातन संस्थेचे सेक्टर ९ येथील प्रदर्शन !

सनातन संस्थेचे दुसरे प्रदर्शन सेक्टर क्रमांक ९ येथे १४ जानेवारी या दिवशी शांभवी पीठाचे आणि काली सेना या संघटनेचे प्रमुख श्री आनंद स्वरूप महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. असे असले, तरी १० जानेवारीला प्रदर्शन काही प्रमाणात लावत असतांना काही सात्त्विक वस्तूंच्या मोजणीसाठी प्रदर्शन उघडले होते. त्या दिवशी रात्री ८ वाजताच जिज्ञासूंनी प्रदर्शन पहाण्यास गर्दी करायला प्रारंभ केला. तेव्हापासून प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद आहे. कुंभनगरीतील कलश द्वाराजवळच हे प्रदर्शन उभे आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर १० दिवसांत १५ सहस्र ५०० हून अधिक जिज्ञासूंनी भेट दिली. आतापर्यंत १ सहस्र ३०० हून अधिक जिज्ञासूंनी अभिप्राय दिले आहेत. १९ जानेवारीला, म्हणजेच रविवारी २ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी भेट दिली. या सेक्टरला निरंजनी आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरि महाराज आणि ‘गुरुकार्ष्णि’ या पू. रमेशभाई ओझा यांच्याशी संबंधित संस्थेचे अत्यंत भव्य मंडप आहेत. ते पहाण्यासाठी येणारे लोकही सनातन संस्थेच्या या कक्षाला भेट देतात. येथे ज्योतिषी असलेले एक जिज्ञासू ५-६ वेळा येथे भेटी देण्यासाठी आले. त्यांनी प्रत्येक भेटीत वेगवेगळे ग्रंथ अधिक संख्येने खरेदी केले.
महत्त्वाचे, म्हणजे या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ६६ एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, कुंभनगरी, प्रयागराज, उत्तरप्रदेश (२१.१.२०२५)
काही जिज्ञासूंचे अभिप्राय
१. नीता बग्गा, लक्ष्मणपुरी (लखनौ) : प्रदर्शन चांगले आहे. सर्व कार्यकर्ते सज्जन आणि महिला या मृदूभाषी आहेत.
२. डॉ. प्रदीप : धर्मशास्त्राविषयी क्रमबद्ध पद्धतीने चांगले मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे अल्प वेळेत चांगली माहिती मिळाली.
३. श्री. नरेंद्र बहाद्दुर सिंह, निवृत्त प्रबंधक, ग्रामीण बँक, प्रतापगड, उत्तरप्रदेश : अन्य राज्यांमध्येही असे प्रदर्शन लावले पाहिजे. त्यामुळे हिंदूंना ज्ञान मिळेल. प्रदर्शनाचे ठिकाण लहान असूनही पुष्कळ उपयुक्त माहिती सांगितली आहे. सर्व आखाड्यांमध्ये असे प्रदर्शन लावले पाहिजे. यातून धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.
(श्री. नरेंद्र सिंह हे २ दिवस प्रदर्शन पहायला आले. त्यांनी ग्रंथही खरेदी केले. – संकलक)
सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला मान्यवरांची भेट
उत्तरप्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ‘गंगा’विषयाचे न्यायमित्र’ अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता यांनी भेट दिली, त्याचप्रमाणे कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनीही भेट दिली.