Foreign Birds In Prayagraj : प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या ठिकाणाहून फेब्रुवारीमध्ये परत जाणारे परदेशी पक्षी अद्यापही तळ ठोकून !

  • शास्त्रज्ञ आश्चर्यचकित !

  • संगमाच्या शुद्ध पाण्याच्या आणि हवेच्या शुद्धतेचा हा पुरावा असल्याचे मत

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे प्रतिवर्षी डिसेंबरच्या अखेरीस रशिया, सायबेरिया आणि पोलंड यांसारख्या थंड हवेच्या देशांमधून सहस्रो परदेशी पक्षी प्रयागराजमधील पवित्र त्रिवेणी संगम परिसरात येतात. साधारणपणे फेब्रुवारीच्या अखेरीस निघून जाणारे हे पक्षी या वेळी १३ मार्चपर्यंत संगम किनारी तळ ठोकून आहेत. महाकुंभपर्वाच्या समाप्तीच्या १५ दिवसांनंतरही संगम किनार्‍यावर मोठ्या संख्येने परदेशी पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेते. पक्षीशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ यांना असा विश्वास आहे की, हा संगमाच्या शुद्ध पाण्याच्या आणि हवेच्या शुद्धतेचा पुरावा आहे. परदेशी पक्ष्यांची दीर्घकाळ उपस्थिती, हे पर्यावरणीय शुद्धतेचे लक्षण आहे.

पक्षीतज्ज्ञ प्रा. संदीप मल्होत्रा म्हणतात की, लारस रिडिबुंडस प्रजातीच्या या  परदेशी पक्षांची उपस्थिती, ही पाणी प्रदूषणमुक्त आणि हवा स्वच्छ असल्याचे सूचक मानले जाते. जेव्हा पाण्यात असलेले जलचर सुरक्षित असतात आणि वातावरण अनुकूल असते, तेव्हाच हे पक्षी नैसर्गिकरित्या थांबतात. महाकुंभपर्वाच्या वेळी गंगानदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले, हे त्यांच्या दीर्घ उपस्थितीवरून दिसून येते.

गंगा नदीतील डॉल्फिनच्या संख्येत वाढ !

उत्तरप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरूनही संगम परिसरातील पाणी आणि हवा पूर्वीपेक्षा फारच शुद्ध झाल्याचे सिद्ध होते. गंगा नदीत डॉल्फिनची वाढती संख्या, ही पाण्याच्या स्वच्छतेचा पुरावा आहे. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त (३ मार्च २०२५) पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गंगा नदीत डॉल्फिनची संख्या वर्ष २०२१ मध्ये अनुमाने ३ सहस्र २७५ वरून ६ सहस्र ३२४ इतकी झाली आहे. विशेषतः प्रयागराज आणि पाटलीपुत्र येथील गंगा नदीच्या प्रवाहात डॉल्फिनची संख्या वाढली आहे. यावरून गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे, हे दिसून येते.

डॉल्फिनच्या वाढत्या संख्येमुळे शस्त्रज्ञ समाधानी !

संगम परिसरात पाणी आणि हवा यांची शुद्धता राखली, तर ते जैवविविधतेच्या दृष्टीने लाभदायी ठरेल, असे पर्यावरणतज्ञ आणि पक्षीतज्ञ यांचे म्हणणे आहे. गंगा नदीत परदेशी पक्ष्यांची संख्या आणि डॉल्फिनची वाढती संख्या, यांमुळे प्रयागराजचे वातावरण पूर्वीपेक्षा फारच चांगले झाले आहे, याची पुष्टी झाली आहे.

महाकुंभपर्वात केलेल्या प्रयत्नांचा परिणाम !

महाकुंभपर्व २०२५ मध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी गंगा नदीची स्वच्छता अन् प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या. ‘नमामि गंगे’ या  योजनेअंतर्गत गंगा नदीच्या पाण्यात नाल्याचे घाणेरडे पाणी सोडण्यास बंदी होती. सरकारच्या या प्रयत्नांचा परिणाम आता दिसून येत आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर येत्या काळात गंगा नदीचे पाणी आणखी स्वच्छ होईल.

भविष्यातही स्वच्छता मोहीम चालू ठेवण्याची आवश्यकता !

सरकारने पाण्याच्या स्वच्छतेसाठी उचललेली पावले पुढे चालू ठेवावीत, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. महाकुंभपर्वानंतरही गंगा नदीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कचर्‍याची विल्हेवाट आणि प्रदूषण नियंत्रण उपाययोजना काटेकोरपणे राबवणे आवश्यक आहे, तरच ही परिस्थिती दीर्घकाळ टिकू शकते.

संपादकीय भूमिका

गंगा नदीच्या पाण्याला अशुद्ध म्हणणारे आणि त्याला हडतुड करणारे आता बोलतील का ?