कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात विशेष पोलीस पथक, राज्य गुन्हे अन्वेषण पथक, तसेच ज्या ज्या अन्वेषण यंत्रणांनी जे जे पुरावे गोळा केले आहेत आणि जे न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले नाहीत ते पुरावे, सूची, तसेच या संदर्भातील सर्व सामुग्री बचाव पक्षाला मिळावी, अशी मागणी बचाव पक्षाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात केली. अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकालांचे दाखले न्यायालयात सादर केले. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. त्या सुनावणीच्या कालावधीत त्यांनी ही मागणी केली.

१७ जानेवारीला सरकार पक्षाच्या वतीने कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील एक तक्रारदार मुकुंद कदम यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. ही साक्ष सरकार पक्षाच्या वतीने विशेष अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांनी नोंदवली. या प्रसंगी सरकारी अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. बचाव पक्षाच्या वतीने मुकुंद कदम यांची उलटतपासणी ज्येष्ठ अधिवक्ता अनिल रुईकर यांनी घेतली. या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता डी.एम्. लटके, अधिवक्ता आदित्य मुद़्गल, अधिवक्ता सारंग जोशी, अधिवक्त्या प्रीती पाटील आणि अधिवक्ता बडवे हे उपस्थित होते.