१. काँग्रेसच्या सत्ताकाळात धर्मांधांकडून शेकडो बाँबस्फोट
‘फटाके फोडावेत, तसे धर्मांध मुसलमानांनी भारतभर बाँबस्फोटाच्या मालिका चालवल्या होत्या. गुजरातमध्ये अक्षरधामपासून अनेक बाँबस्फोट केले. मुंबईमध्ये वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटात २५७ व्यक्ती मृत झाल्या होत्या. त्यानंतर वेस्टर्न लाईनवर रेल्वेच्या डब्यात बाँबस्फोट करण्यात आले. तत्पूर्वी कोईम्बतूरमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेत बाँबस्फोट करण्यात आला. असे कित्येक बाँबस्फोट झाले, ज्यात शेकडोंनी भारतीय नागरिक मृत्यू पावले आणि सहस्रो नागरिक गंभीर घायाळ झाले.

या आतंकवादाचा परिणाम उद्योग, व्यवसाय आणि जनमानस यांच्यावर मोठ्या प्रमाणावर झाला. मुंबईत परिस्थिती अशी होती की, कामावर निघालेला व्यक्ती रात्री घरी परत येईल कि नाही ?, याची भीती सतावत होती. धर्मांध मुसलमानांनी नुसतेच बाँबस्फोट घडवले नाही, तर भीषण दंगलीही घडवल्या. काँग्रेसला मुसलमानांची एकगठ्ठा मते हवी होती. त्यामुळे हिंदु किंवा भारतीय नागरिकांच्या मृत्यूचे त्यांना सुवेरसुतक नव्हते.
२. तत्कालीन काँग्रेस सरकारकडून ‘हिंदु आतंकवाद’ शब्दाचा प्रचार
सातत्याने बाँबस्फोट होत असल्याने धर्मांध मुसलमानांविषयी भारतीय नागरिकांमध्ये संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते. बहुसंख्य जनता त्यांच्यापासून दुरावतील; म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे तुणतुणे वाजवणे चालू केले. वास्तविक जितके बाँबस्फोट घडले, त्या सर्वांमध्ये मुसलमानच आरोपी होते आणि ते भारताच्या शत्रूराष्ट्राकडून प्रेरणा घेऊन देशाला अस्थिर करत होते.
याच काळात ८.९.२००६ यादिवशी नाशिकजवळील मालेगाव येथे धर्मांध मुसलमानांनी बाँबस्फोट केले आणि त्यात ३० मुसलमान मृत्यूमुखी पडले. यात त्यांचा भीषण दंगली करण्याचा उद्देश होता. तत्कालीन काँग्रेस सरकारने जे काही अपवादात्मक बाँबस्फोट झाले, त्याला ‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘हिंदु आतंकवाद’ असे नाव दिले. आता मात्र आतंकवादाला ‘भगवा रंग’ असल्याचा कांगावा चालू केला आणि त्याला हिंदु धर्म उत्तरदायी असल्याचे वातावरण निर्माण केले. त्यांनी ‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘हिंदु आतंकवाद’ असे शब्दप्रयोग रूढ केले. त्यादृष्टीने पुरावे मिळवण्यासाठी निष्पाप हिंदूंना नाहक गोवले. ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द रूढ करण्यासाठी सोनिया गांधी, तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम्, तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उत्तरदायी आहेत.
३. धर्मांध आरोपींचे लांगूलचालन
‘हिंदु आतंकवाद’ हा दावा सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने मालेगाव बाँबस्फोटातील मुसलमान आरोपींविरुद्धचे आरोपपत्र पालटले आणि त्यांना निर्दोष मुक्त केले. तत्कालीन सरकारने केवळ त्यांच्याविरुद्धचे खटलेच मागे घेतले नाहीत, तर त्यांच्यावर झालेल्या कथित अन्यायासाठी त्यांना हानीभरपाईही दिली. ‘या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला सरकारी नोकरी द्यावी’, अशी अट धर्मांध मुसलमानांनी काँग्रेसला घातली होती.
मालेगावच्या पहिल्या बाँबस्फोटात मुसलमानांचा सहभाग नाही, असे सांगण्यात आले आणि त्यांचे उदात्तीकरण केले. वास्तविक हा स्फोट त्यांनीच घडवला होता. अशा प्रकारचे निष्कर्ष अन्वेषण यंत्रणांच्या आरोपपत्रात होते. ते धुडकावून त्यांना निर्दोषत्व बहाल करण्यात आले आणि त्यांना तत्कालीन काँग्रेस सरकारने मोठ्या प्रमाणात हानीभरपाई दिली.
४. कथित नांदेड बाँबस्फोट प्रकरणातील खटले निकाली
नांदेड, परतूर आणि जालना येथे कथित बाँबस्फोट झाले अन् ते हिंदूंनी केले, असे आरोप झाले. हे सगळे अन्वेषण हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी आतंकवादविरोधी पथक, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्याकडे देण्यात आले. नांदेड येथे शोभेची दारू सिद्ध करतांना बाँबस्फोट झाला. त्यात नरेश राजकोंडवार आणि हिमांशु पानसे जागेवर मृत्यूमुखी पडले, तर काही हिंदू घायाळ झाले. त्यानंतर झालेले अन्वेषण असे दर्शवत होते की, हा स्फोट शोभेची दारू किंवा फटाके सिद्ध करतांना झालेला आहे आणि याचा आतंकवादाशी काहीही संबंध नाही. स्थानिक पोलीसही हेच म्हणत होते. असे असतांनाही याचे अन्वेषण स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन आतंकवादविरोधी पथक आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्याकडे देण्यात आले. त्याचा संबंध परतुर, परभणी, जालना आणि मालेगाव या बाँबस्फोट प्रकरणांशी जोडण्यात आला. यासाठी सरकारने प्रतिष्ठा पणाला लावून या सर्व केंद्रीय अन्वेषण यंत्रणांना कामाला लावले आणि ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी नांदेडमध्ये १२ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खटला प्रविष्ट करण्यात आला. ‘या बाँबस्फोट प्रकरणांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांच्याशी संबंधित व्यक्ती सहभागी आहेत’, असा आरोप करण्यासही तत्कालीन काँग्रेस सरकार कचरले नाही. यासंदर्भातील खटले गेली १९ वर्षे चालू होते, जे नुकतेच संपले.
५. नांदेड बाँबस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष
या प्रकरणात फौजदारी गुन्हे नोंदवल्यावर पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांनी नांदेड शहरात एवढी दहशत निर्माण केली होती की, हिंदु आरोपींना त्याकाळी स्थानिक अधिवक्तेही मिळणे दुरापास्त झाले होते. अशा प्रकारची जरब पोलिसांनी अधिवक्ता मंडळींवर बसवली होती. या सर्वांचा संबंध विविध ठिकाणी झालेले स्फोट, तसेच निवृत्त सैन्याधिकारी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याशी जोडण्यात आला. नांदेड प्रकरणाची सुनावणी प्रदीर्घ काळ चालू होती. यात १९ वर्षांनंतर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सर्व १२ हिंदु आरोपींना निर्दोष मुक्त केले. यात ‘हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी ४९ साक्षीदार तपासले गेले आणि २ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते. राजकोंडवार यांच्यासह जे १२ आरोपी गेली १९ वर्षे हा मनस्ताप सहन करत होते. या पार्श्वभूमीवर १९ वर्षे अन्याय सहन करणार्या निरपराध १२ हिंदूंनाच सरकारने हानीभरपाई द्यावी, असे जनतेला वाटते, तसेच त्यांचा यथोचित सन्मानही व्हावा. यासमवेतच ‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘हिंदु आतंकवाद’ असे आरोप करणार्या काँग्रेस पक्षाने विशेषत: सोनिया गांधी, चिदंबरम् आणि सुशीलकुमार शिंदे यांनी सार्वजनिकपणे क्षमायाचना करावी.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (६.१.२०२५)