
पुण्याच्या उपनगरांमध्ये आणि पुण्याला लागून असलेल्या गावांमध्ये ‘नशायुक्त पान’ खाण्याचे तरुणांमध्ये पुष्कळ वेड आहे. ‘दारूच्या अनेक बाटल्या प्यायल्यानंतर जेवढी नशा येते, तितकी नशा हे एक पान खाल्ल्यानंतर येते’, असे हे पान खाणारे लोक सांगतात. या पानामध्ये ‘किमाम’ नावाचा तंबाखू मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हे नशायुक्त पान कधीही न खाणार्या व्यक्तीने खाल्ल्यास तिला लगेच चक्कर येऊन व्यक्ती बेशुद्ध पडते. असे असूनही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असे नशायुक्त पान खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पुण्यासारख्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहरात नशायुक्त पानांसारखे व्यसन तरुण पिढीमध्ये वाढत असल्याचे चित्र गंभीर आहे. यामुळे केवळ शारीरिक आरोग्यावर तर गंभीर परिणाम होतातच; पण मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यावरही त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात.
गोवा गुटखा, चरस, गांजा यांसारख्या मादक पदार्थांची विक्री आता या पानांमधूनही होत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पानवाल्यांपासून ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर’ही अशा पदार्थांची विक्री होत आहे. त्यात आकर्षक बांधणी आणि पानाची केली जाणारी प्रसिद्धी यांमुळे तरुणांमध्ये हे पदार्थ ‘फॅशन’ किंवा ‘स्टेटस’ म्हणून वापरले जात आहेत. अशा पानांमुळे मोठ्या प्रमाणात तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हे सर्व परिणाम गंभीर असूनही आजची तरुण पिढी त्यात वहावत जात आहे, हे दुर्दैवी आहे; पण सांगणार कोण ? एकीकडे देश आत्मनिर्भर होत असतांना देशाचे तरुण नशेबाज होत आहे, हे पुष्कळ लाजिरवाणे आहे. नशा करून स्वतःच स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी लहान वयापासूनच त्यांना धर्मशिक्षण देणे आणि साधना शिकवणे हाच पर्याय आहे !
नशायुक्त पान आणि अशा पदार्थांच्या विक्रीवर कठोर निर्बंधही आणायला हवेत. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी यावर लक्ष ठेवून कठोर कारवाई करावी. काही देशांमध्ये नशायुक्त पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी अतिशय कठोर शिक्षेचे प्रावधान आहे. सिंगापूरचा कडक कायदा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिथे नशेचे प्रमाण अत्यल्प आहे. सौदी अरेबियामध्ये नशायुक्त पदार्थांची तस्करी किंवा विक्रीसाठी सरळ मृत्यूदंडाचे प्रावधान आहे. परदेशातील विविध देशांमध्ये मादक पदार्थांचे सेवन, विक्री आणि वितरण यांच्या विरोधात कठोर कायदे आहेत. परदेशात कठोर शिक्षा होत असल्याने व्यसनाधीनतेला आळा बसला आहे; मात्र भारतात कार्यवाहीत त्रुटी आणि भ्रष्टाचार होत असल्यामुळे कायद्यांचा पुरेसा प्रभाव दिसत नाही. भारतानेही कायद्याची प्रभावी कार्यवाही अन् जनजागृती मोहीम राबवायला हवी.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे