प्रयागराज – १५ जानेवारीच्या मध्यरात्री सेक्टर क्रमांक २० मध्ये साधूंनी वीज विभागाच्या २ कंत्राटदारांसह १५ हून अधिक जणांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. मारहाण करण्यासाठी साधूंनी पोलीस कर्मचार्यांकडून लाठ्या हिसकावून घेतल्याचा आरोप केला जात आहे. गोंधळ झाल्यानंतर मध्यरात्री मेळा अधिकारीही घटनास्थळी पोचले. कंत्राटदाराने साधूंविरुद्ध झूंसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना वीज विभागाच्या स्टोअरमध्ये वीज गेल्यानंतर घडली. कंत्राटदार आशिष द्विवेदी यांनी आरोप केला की, काशी मंदिर सेवा अन्नक्षेत्र समितीच्या शिबिरातून ८ साधू मोटारसायकल आणि कारने आले. त्यांनी मुंशी दिव्यांशु शुक्ल यांना वीज नसण्याचे कारण विचारले, तेव्हा दिव्यांशु यांनी सांगितले की, १८ सहस्र व्होल्टची लाईन ट्रिप झाली आहे आणि लवकरच वीज येईल; मात्र एका साधूंनी त्यांना ढकलले. या वेळी शुक्ल यांना वाचवण्यासाठी आलेले मुंशी शुभम मिश्रा आणि रमन तिवारी यांनाही मारहाण करण्यात आली. ही माहिती मिळताच घटनास्थळी आलेले कंत्राटदार आशिष आणि त्यांचा भाऊ गुलाब द्विवेदी यांनाही दुसर्या शिबिरांतून आलेल्या २५-३० साधूंनी मारले. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे कंत्राटदारांसह ८ जण गंभीर घायाळ झाले आहते. साधूंवर कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन करण्याची चेतावणी कंत्राटदार आशिष द्विवेदी यांनी दिली.
मद्याच्या नशेत कर्मचार्यांनी साधूंवर आक्रमण केले ! – महंत बालकदास
महंत बालकदास म्हणाले, ‘‘वीज गेल्यानंतर काही संन्यासी वीज विभागाच्या स्टोअरमध्ये गेले होते. तेथे असलेले कंत्राटदार आणि मुंशी मद्याच्या नशेत होते. त्यांनी साधू-संतांवर आक्रमण केले. यात अनेक साधू घायाळ झाले आहेत. याची तक्रार दिली जाईल. साधूंनी कुणालाही मारले नाही.’’