
सातारा, ३० जानेवारी (वार्ता.) – येथील कोंडवे परिसरातील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीस्वारावर चालत्या गाडीतून गोळीबार करण्यात आला. या घटनेत एका युवकाच्या गुडघ्याला, तर दुसर्याच्या कमरेला गोळी लागली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये चित्रीत झाली आहे. घायाळ युवकांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून पोलिसांची ३ पथके विविध ठिकाणी पाठवली आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.