श्री देवदेवेश्‍वर संस्‍थानकडून (पुणे) ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे’ पुरस्‍कार घोषित !

सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक महोत्‍सव !

डावीकडून जगन्‍नाथ लडकत, बोलतांना प्रमुख विश्‍वस्‍त रमेश भागवत, सुधीर पंडित, पुष्‍कर पेशवा

पुणे, २९ जानेवारी (वार्ता.) – ‘श्री देवदेवेश्‍वर संस्‍थान’कडून सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक महोत्‍सव ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत होईल. या वेळी ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्‍यात्मिक आणि सामाजिक’ पुरस्‍कारांचे वितरण करण्‍यात येईल. यंदाचे आध्‍यात्मिक पुरस्‍कार प.पू. भागवताचार्य शरदशास्‍त्री जोशी (पुणे) आणि प्रा. स्‍वानंद पुंड (वणी) यांना प्रदान करण्‍यात येणार असल्‍याची माहिती ‘श्री देवदेवेश्‍वर संस्‍थान’चे प्रमुख विश्‍वस्‍त श्री. रमेश भागवत यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये दिली. या वेळी संस्‍थानचे विश्‍वस्‍त सुधीर पंडित, पुष्‍कर पेशवा, जगन्‍नाथ लडकत उपस्‍थित होते.

पुरस्‍कारांचे वितरण डॉ. कल्‍याणीताई नामजोशी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येईल. श्री सिद्धिविनायक देवतेच्‍या वार्षिक महोत्‍सवामध्‍ये सामुदायिक श्री ब्रह्मणस्‍पतीसूक्‍त पठण, आयुर्वेद आणि आयुष्‍यमान, शास्‍त्रीय गायन, डिजिटल आणि सायबर क्राईम, अथर्वशीर्ष पठण, श्री गणेश याग, संतूर वादन, वारकरी संप्रदाय कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.