सातारा येथे २ फेब्रुवारीला राज्‍यस्‍तरीय ज्‍योतिष अधिवेशन !

सातारा, ३० जानेवारी (वार्ता.) – येथील श्री स्‍वामी समर्थ गणेश चॅरिटेबल ट्रस्‍ट आणि मराठी ज्‍योतिषी महामंडळ यांच्‍या वतीने २ फेब्रुवारी या दिवशी एक दिवसाचे ‘राज्‍यस्‍तरीय ज्‍योतिष अधिवेशना’चे आयोजन केले आहे. हे अधिवेशन बाँबे रेस्‍टॉरंट चौकाजवळ सुरभी मंगल कार्यालयामध्‍ये सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार आहे. या वेळी वास्‍तूमित्र आणि अंकमित्र पुरस्‍कारांचे वितरण होणार आहे. अधिवेशनासाठी राज्‍यातील ज्‍योतिष क्षेत्रातील अनेक मान्‍यवर उपस्‍थित रहाणार आहेत.

अधिवेशनाचे उद़्‍घाटन आमदार महेश शिंदे यांच्‍या हस्‍ते होणार असून अध्‍यक्षस्‍थानी पंडित अतुलशास्‍त्री भगरेगुरुजी आहेत. या वेळी ज्‍योतिषशास्‍त्र, वास्‍तूशास्‍त्र, अंकशास्‍त्र आणि पौरोहित्‍य क्षेत्रात अनेक वर्षे आपले बहुमूल्‍य योगदान देणार्‍या मान्‍यवरांना ‘मराठी ज्‍योतिष मंडळा’च्‍या वतीने विशेष पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

या वेळी विविध क्षेत्रांतील तज्ञ मान्‍यवर वक्‍ते ज्‍योतिषशास्‍त्र, वास्‍तूशास्‍त्र, अंकशास्‍त्र, टॅरो, हस्‍तरेषा, पंचपक्षीशास्‍त्र अशा अनेक महत्त्वाच्‍या विषयांवर उपस्‍थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाचा लाभ समस्‍त ज्‍योतिषप्रेमी जिज्ञासूंनी घ्‍यावा, असे आवाहन ‘मराठी ज्‍योतिषी मंडळा’चे अध्‍यक्ष ज्‍योतिषाचार्य डॉ. नीलेश कुलकर्णी यांनी केले आहे.