‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रमंत्राचा प्रसार करणार्या ‘संगीत आनंदमठ’च्या निमित्ताने…
सांगली – इतिहास, तसेच सांस्कृतिक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणार्या सांगलीतील लेखिका सौ. विनिता शैलेंद्र तेलंग यांनी लिहिलेले आणि रवींद्र सातपुते दिग्दर्शित ‘संगीत आनंदमठ’ हे संगीत नाटक ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता पुणे येथील ‘भरत नाट्यमंदिर’ येथे सादर होत आहे. ‘कोलाज क्रिएशन्स’ प्रस्तुत हे नाटक ‘वन्दे मातरम् सार्ध शती समिती, पुणे’ यांच्या सहयोगाने सादर होत आहे. हेच नाटक इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे चालू असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत श्रीमंत घोरपडे सभागृह येथे ६ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे. तरी त्या निमित्ताने या नाटकाविषयी आमच्या वाचकांसाठी…!
‘आनंदमठ’ ही ऋषि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली अजरामर कादंबरी आहे; भारतीय अध्यात्म आणि राष्ट्रभक्ती यांचा अपूर्व संगम आहे. ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रमंत्राचा प्रसार करणारी ही पहिली साहित्य कृती होय !
वर्ष १८७० च्या दशकात बिहारपासून आजच्या बांगलादेशपर्यंतच्या भूमीवर संन्याशांनी इंग्रज आणि बंगालमधील तत्कालीन सत्ताधिशांविरुद्ध केलेल्या सशस्त्र लढ्याचे चित्रण असलेल्या या कादंबरीत नवरसांचा आविष्कार असला, तरी केंद्रस्थानी आहेत भक्तीरस आणि वीररस ! या कादंबरीने स्वातंत्र्यलढ्यातील श्री. अरविंद घोष, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक महत्त्वाच्या नेत्यांना क्रांतीलढ्याची प्रेरणा दिली. ७ नोव्हेंबर १८७५ अर्थात् कार्तिक शुक्ल नवमीच्या दिवशी ऋषि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिले. ‘वन्दे मातरम्’ या हिर्याला ‘आनंदमठ’चे अत्यंत सुंदर कोंदण लाभले. ‘वन्दे मातरम्’च्या जन्मानंतर ७ वर्षांनी म्हणजे वर्ष १८८२ मधे ‘आनंदमठ’ कादंबरी नाट्यस्वरूपात बंगाली रंगभूमीवर सादर झाली.
२०२५ हे ‘वन्दे मातरम्’च्या १५० वे वर्ष (सार्ध शतीनिमित्त) ‘स्फुरण स्मरण वर्ष’ !
वर्ष २०२५ हे ‘वन्दे मातरम्’ या गीताचे १५० वे वर्ष (सार्ध शती) आहे. वर्ष १८९० च्या सुमारास ‘नीलदर्पण’सारखी ज्वलंत राष्ट्रभक्तीची बंगाली नाटके लगेचच मराठी रंगभूमीवर अनुवाद होऊन आली; परंतु ‘आनंदमठ’ याला अपवाद राहिले. वर्ष २०२५ हे वंदे मातरम्च्या १५० वर्ष (सार्ध शतीनिमित्त) ‘स्फुरण स्मरण वर्ष’ आहे. या निमित्ताने ही क्रांतीकारक कादंबरी १२५ वर्षांनंतर प्रथमच मराठी रंगभूमीवर नाट्यस्वरूपात येत आहे.
‘आनंदमठ’ कादंबरीची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. वर्ष १८८२ मध्येे प्रकाशित झालेल्या मूळ कादंबरीच्या शताब्दीनिमित्त वर्ष १९८३ मध्ये विशेष आवृत्ती प्रकाशित झाली. या सर्व मूळ संहितांचा अभ्यास करून सौ. विनिता तेलंग यांनी कादंबरीचे मराठीत नाट्यरूप केले आहे. या नाटकाचे संगीतकार श्री. अजय पराड गेले ४० वर्षे अभिजात शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ संवादिनीवादक, तसेच संगीतकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चा ११ सहस्र मुलांच्या समूहगायनाचा उपक्रम गाजलेला आहे.
‘वन्दे मातरम्’ सार्ध शती वर्षाच्या निमित्ताने ‘आनंदमठ’ कादंबरी मंचस्थ करणे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्व चमू सिद्ध झाला आहे !