
नवी देहली – उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा अंगीकारली असून केवळ मतांच्या लाचारीसाठी त्यांच्या पक्षाने वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ३० जानेवारी या दिवशी त्यांच्या हस्ते ९८ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या नवी देहलीतील कार्यालयाचे उद़्घाटन पार पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीने मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारले; मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी याला विरोध केला. उद्धव ठाकरेंच्या सेनेने सातत्याने लांगूलचालनाची भूमिका घेतली आहे. केवळ एका समाजाच्या पाठीशी उभे रहायचे, ही काँग्रेसची अल्पसंख्यांक लांगूलचालनाची परंपरा ठाकरेंच्या सेनेने अंगीकारली, हे बघून अतिशय दु:ख झाले. वक्फ बोर्डाचे विधेयक हे कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. मुसलमान समाजाच्या विरोधात तर अजिबात नाही. वक्फच्या माध्यमातून चालू असलेला गैरव्यवहार संपावा, यासाठी हे विधेयक आणले आहे. अशा परिस्थितीत केवळ मतांच्या लाचारीसाठी त्याचा विरोध करत असतील, तर ते महाराष्ट्राची जनता पहात आहे. ते कशा प्रकारे लांगूलचालन करत आहेत, हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे.’’