थोडक्यात महत्त्वाचे – दिवसभरातील घडामोडी

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डांबर चोरणारी टोळी गजाआड !; बंगालमधील महिलेने मुलीला पळवले !…

डांबर चोरणारी टोळी गजाआड !

कराड : सुर्ली येथे डांबराची चोरी करणारी आंतरराज्‍य टोळी गुन्‍हे प्रकटीकरण शाखेने पकडली. त्‍यांच्‍याकडून २ लाख रुपये किमतीचे ४ टन डांबर आणि १५ लाख रुपये किमतीचा टँकर असा १७ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्‍त केला आहे. उद्योजक उदय धनाजीराव जाधव यांनी याविषयी तक्रार दिली होती.


बंगालमधील महिलेने मुलीला पळवले !

मुंबई : वरळी येथे मूळच्‍या बंगलच्‍या दीपाली दास या महिलेने ३ वर्षांच्‍या मुलीचे अपहरण केले. ३ घंट्यांत पोलिसांनी  प्रेमनगर परिसरात रहाणार्‍या या महिलेला शोधून अटक केली. ‘चॉकलेट देण्‍याच्‍या बहाण्‍याने गल्लीतून खेचून घेऊन गेली’, असे मुलीच्‍या आईने सांगितले. मुंबई पोलिसांनी पथके सज्‍ज करून अन्‍वेषण केले. सीसीटीव्‍ही चित्रणाची फीत त्‍यांनी सामाजिक माध्‍यमांवर टाकली आणि स्‍थानिकांचे साहाय्‍य घेतले.


अतिक्रमण पाडल्‍यावरून आंदोलन !

पिंपरी-चिंचवड : येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्‍यात आली. अतिक्रमित बांधकामांवर कारवाई करण्‍याच्‍या विरोधात ३० जानेवारीला दुपारी शेकडो लोकांनी रस्‍त्‍यावर उतरून ‘रस्‍ता बंद’ आंदोलन केले. (शेकडो लोकांना कायद्याप्रमाणे वागायचे नाही, असाच अर्थ आहे. अनधिकृत बांधकामे होऊ देणार्‍या अधिकार्‍यांवरच कारवाई करायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका : अनधिकृत बांधकामे उभी राहूच कशी दिली जातात ?


मंदिरांत चोरी करणार्‍या चोरांना पकडले !

अकोला : येथे ३ मंदिरांत चोरी करणार्‍या चोरट्यांना स्‍थानिक गुन्‍हे शाखेने अटक करून चोरांकडून चोरीचा माल जप्‍त केला.


शेगाव येथे गांजा जप्‍त

शेगाव : येथे ४२ लाख रुपयांचा गांजा जप्‍त करण्‍यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.


युक्रेनियन अभिनेत्‍याला अटक

टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरण

मुंबई : टोरेस आर्थिक घोटाळ्‍याप्रकरणी युक्रेनियन अभिनेता अर्मेन अटेनल याला आर्थिक गुन्‍हे शाखेच्‍या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्‍याला किल्ला न्‍यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्‍ह्यांत अटक झालेला अर्मेन हा सहावा आरोपी आहे. यापूर्वी याच गुन्‍ह्यांत ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्‍यापैकी चार जण न्‍यायालयीन कोठडीत आहेत.

युक्रेनियन अभिनेता अर्मेन अटेनल हा मालवणीतील मढ परिसरात लपला असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यानुसार सापळा रचून त्‍याला अटक केली. अर्मेन हा युक्रेनियन नागरिक असून अभिनेता म्‍हणून परिचित आहे.