युवा पिढीच्‍या दृष्‍टीने सनातनचे प्रदर्शन आजच्‍या काळात आवश्‍यक ! – ह.भ.प. तपोनिधी नारायण महाराज, श्री सद़्‍गुरु ज्ञानेश्‍वर माऊली उत्तरेश्‍वर पिंपरीकर संस्‍थान, महाराष्‍ट्र

ह.भ.प. तपोनिधी नारायण महाराज

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्‍थेचे हे कार्य साधू, संत, ऋषिमुनी, जप-तप करणारे यांनी पुढे नेलेले आहे. राष्‍ट्राच्‍या दृष्‍टीने आजच्‍या काळात युवा पिढीच्‍या दृष्‍टीने हे प्रदर्शन आवश्‍यक आहे. आताच्‍या पिढीला आपली संस्‍कृती काय आहे ? आपण कसे राहिले पाहिजे ? याचे ज्ञान देण्‍याचे अतिशय मोलाचे आणि कठीण असे हे कार्य अतिशय उदात्त हेतूने सनातन संस्‍था करत आहे. सनातनच्‍या या कार्याला माझे अखंड समर्थन राहील, असे मार्गदर्शन बीड (महाराष्‍ट्र) येथील श्री सद़्‍गुरु ज्ञानेश्‍वर माऊली उत्तरेश्‍वर पिंपरीकर संस्‍थानचे ह.भ.प. तपोनिधी नारायण महाराज यांनी येथे केले.

ह.भ.प. तपोनिधी नारायण महाराज यांनी २६ जानेवारी या दिवशी कुंभक्षेत्री लावलेले सनातनचे ग्रंथ प्रदर्शन पाहिल्‍यानंतर ते मार्गदर्शन करत होते. या वेळी सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांनी त्‍यांचा सन्‍मान केला. ह.भ.प. तपोनिधी नारायण महाराज पुढे म्‍हणाले की, या प्रदर्शनातील सनातन संस्‍थेच्‍या साधक बंधू-भगिनींच्‍या सहवासात आल्‍यानंतर मला अतिशय प्रेमाचे आणि जिव्‍हाळ्‍याचे असे नातेसंबंध अनुभवायला मिळत आहेत. या कार्याला माझे योगदान नेहमीच राहील. संस्‍कृती संवर्धन अन् सुधारणा करण्‍यास उद्युक्‍त करणारे हे कार्य पाहून मला मनस्‍वी आनंद झाला आहे.