अनधिकृत इमारत उद्ध्वस्त होईपर्यंत लढा चालूच रहाणार ! – हिंदुत्वनिष्ठ

  • पन्हळे तर्फे येथील अनधिकृत मदरशातील विद्यार्थ्यांचे अन्यत्र स्थलांतर : इमारतीचा अनधिकृत वापर थांबवला  

  • प्रशासनाच्या लेखी पत्रानंतर ग्रामस्थांनी ५ व्या दिवशी साखळी उपोषण थांबवले !

ग्रामस्थांनी ५ व्या दिवशी साखळी उपोषण थांबवले

राजापूर – तालुक्यातील धोपेश्वर-पन्हळे तर्फे येथील अनधिकृत मदरशातील विद्यार्थ्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. संबंधित इमारतीचा अनधिकृत वापर थांबवण्यात आला आहे. त्यामुळे ५ दिवस चालू असलेले साखळी उपोषण थांबवावे, असे लेखी पत्र येथील तहसीलदार विकास गंबरे यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर ‘हे आमरण उपोषण स्थगित करत आहोत’, अशी घोषणा उपोषणकर्ते अमोल सोगम आणि अन्य स्थानिक ग्रामस्थांनी केली.

या उपोषणाला भाजपसह शिवसेना, ठाकरे गट या पक्षांसह विविध हिंदु संघटनांनीही पाठिंबा दिला होता. दिवसेंदिवस या आमरण साखळी उपोषणाला अनेकांचा पाठिंबा मिळत होता. अनधिकृत मदरशाच्या विरोधात प्रशासनाने कारवाई न केल्यास यापुढे आक्रमक पवित्रा घेण्याची चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने देण्यात आली होती.

३० जानेवारीच्या सकाळी ११ वाजता उपोषणकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना पदाधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि या उपोषणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील विविध भागांतून आलेले हिंदु बांधव यांच्या उपस्थितीत अमोल सोगम यांनी ‘ज्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो, ती मागणी पूर्ण झाल्याने आम्ही उपोषण स्थगित करत आहोत.’, असे सांगितले.

शिक्षण विभागाने दिली होती नोटीस

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून मदरसा चौकशी प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर ‘मदरशातील मुलांना तात्काळ स्थलांतरीत करून इमारतीचा अनधिकृत वापर बंद करण्यात यावा’, अशी कारणे दाखवा नोटीस ‘दारूल हबीब जनरल एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट’ यांना शिक्षण विभागाकडून बजावण्यात आली. या नोटिसीमध्ये हा मदरसा अनधिकृत असल्याचे नमूद करतांना मदरसा चालवण्यासाठी वक्फ बोर्ड वा धर्मादाय आयुक्त यांची कोणतीही अनुमती घेतली नसल्याचे नमूद करत याविषयी खुलासा करावा, अन्यथा मदरसा बंद करण्याविषयी कारवाई केली जाईल, असेही नमूद केले होते.

प्रशासनाचे उपोषणकर्त्यांना पत्र

ग्रामस्थांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार विकास गंबरे आणि राजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी २९ जानेवारीला रात्री उशिरा उपोषणकर्त्याना उपोषण मागे घेण्याच्या विनंतीचे पत्र दिले. या पत्रात म्हटले आहे की, आपण २६ जानेवारी २०२५ पासून तहसीलदार कार्यालय राजापूरसमोर साखळी उपोषणास बसलेले आहात, आपल्या निवेदनातील मागणीप्रमाणे पन्हळे तर्फे राजापूर गट क्रमांक ५१ हिस्सा नं. १ येथील इमारतीमधील विद्यार्थी हे स्थलांतरीत झालेले असून इमारतीचा अनधिकृत वापर थांबलेला आहे, तरी आपण आपले साखळी उपोषण थांबवावे.

अनधिकृत इमारत उद्ध्वस्त होईपर्यंत लढा चालूच रहाणार !- हिंदुत्वनिष्ठ

या उपोषणाच्या सांगता प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाने उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रात ‘अनधिकृत मदरशातील विद्यार्थ्यांना स्थलांतर करण्यात आले असून इमारतीचा अनधिकृत वापर बंद करण्यात आला आहे’, असे नमूद केले आहे; मात्र ही अनधिकृत इमारत उद्ध्वस्त करावी, अशी आमची आग्रही मागणी असून तूर्तास प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण स्थगित केले आहे. अनधिकृत इमारत उद्ध्वस्त होईपर्यंत मात्र आमचा लढा चालूच रहाणार आहे.