१. पू. संदीप आळशी यांनी सत्संगात गुरुपौर्णिमेनिमित्त साधनेचे मोठे ध्येय ठेवण्यास सांगणे आणि साधकाने तीव्र आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करायचे ध्येय ठेवणे
‘२२.५.२०२४ या दिवशी सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक पू. संदीप आळशी यांनी ग्रंथनिर्मिती सेवेतील साधकांच्या सत्संगात सांगितले, ‘‘आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी साधनेच्या प्रयत्नांविषयी मोठे ध्येय ठेवूया.’’ तेव्हा गुरुकृपेने माझ्या मनात आले, ‘१ मासात तीव्र आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय ठेवूया.’ दुसर्या दिवसापासून प्रतिदिन मी ध्यानमंदिरात नामजप करण्यापूर्वी सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी आर्ततेने आणि तळमळीने प्रार्थना करत होतो, ‘माझ्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता न्यून करण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही; पण तुम्हाला अशक्य असे काहीच नाही. माझा त्रास न्यून झाल्यावर मला गुरुदेवांच्या ग्रंथांच्या संकलनाची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, तरी तुम्हीच माझा आध्यात्मिक त्रास न्यून करा ना !’’

२. एका साधिकेने तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना ‘नामजपादी आध्यात्मिक उपाय प्रतिदिन पूर्ण केल्यास तुमचा त्रास १ ते ३ मासांत न्यून होईल’, असा सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांचा निरोप सांगणे
२५.५.२०२४ या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (सद्गुरु काका) यांच्या सांगण्यानुसार आश्रमातील साधिका कु. तृप्ती कुलकर्णी यांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांचा एक सत्संग आयोजित केला. त्या वेळी त्यांनी सद्गुरु काकांचा निरोप सर्वांना सांगितला, ‘आजपासून सर्वांनी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप करणे, आता शिकवत असल्याप्रमाणे स्वतःवरील काळ्या शक्तीचे आवरण काढणे इत्यादी आध्यात्मिक उपाय प्रतिदिन पूर्ण करावे. सर्व साधकांनी या प्रयत्नांचा आढावा सप्ताहातून २ वेळा द्यावा आणि साधकांनी प्रतिदिन हे उपाय पूर्ण न केल्यास आश्रमातील फलकावर चूक लिहावी. हे नामजपादी उपाय प्रतिदिन मनापासून पूर्ण केल्यास १ ते ३ मासांत तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांचा त्रास ‘मध्यम’ आणि ‘मध्यम’ आध्यात्मिक त्रास असणार्यांचा त्रास ‘मंद’ होईल.’ नंतर कु. तृप्ती कुलकर्णी यांनी वरील प्रकारे उपाय करण्यासंबंधी साधकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि सर्वांना सद्गुरु काकांनी सांगितलेल्या उपाययोजनाही सांगितल्या.
३. साधकाच्या मनात ‘सद्गुरु काकांच्या सांगण्यानुसार उपाय प्रतिदिन पूर्ण केल्यावर माझा तीव्र आध्यात्मिक त्रास १ मासात निश्चितच न्यून होईल’, अशी दृढ श्रद्धा निर्माण होणे
वरील सूत्रे ऐकल्यावर माझ्या मनात दृढ श्रद्धापूर्वक विचार आला, ‘आजपर्यंत गुरुदेवांपासून सर्वच संतांनी ‘आध्यात्मिक त्रास पूर्वजन्मांतील प्रारब्धावर अवलंबून असतो’, असे सांगितले आहे. आजपर्यंत सद्गुरु काका किंवा अन्य कोणत्याही संतांनी ‘ठराविक आध्यात्मिक उपाय ठराविक मास नियमित केल्यास साधकांचा आध्यात्मिक त्रास निश्चित न्यून होईल’, असे सांगितले नाही. आता मात्र तो काळ जवळ आल्याने सद्गुरु काकांनी साधकांना वरील निरोप दिला आहे. सद्गुरु काकांचे वाक्य म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’च आहे. आजपर्यंत सद्गुरु काकांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर ‘त्यांनी सांगितलेल्या वेळेच्या पूर्वीच संबंधित आध्यात्मिक त्रास न्यून होतो’, अशी अनुभूती देवाने अनेक साधकांसह मलाही दिली आहे. त्यामुळे आता सद्गुरु काकांनी सांगितल्यानुसार प्रतिदिन आध्यात्मिक उपाय पूर्ण करण्याचे नियोजन केल्यास त्यांच्या संकल्पानुसार माझा आध्यात्मिक त्रास १ मासामध्ये निश्चितच न्यून होईल !’

४. साधकाने प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केल्यावर आध्यात्मिक त्रास टप्प्याटप्प्याने न्यून होत असल्याविषयी आलेल्या अनुभूती
४ अ. स्वतःभोवती प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्याचे अभेद्य संरक्षककवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना केल्यावर साधकाला प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधता येणे : पूर्वी मला तीव्र आध्यात्मिक त्रासामुळे प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार योग्य नामजप शोधता येत नसे. त्यामुळे मी प्रतिदिन प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांना मनापासून आणि तळमळीने वरील प्रार्थना करत होतो. नंतर ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती मनीषा गाडगीळ (वय ६२ वर्षे) यांनी मला ‘स्वतःभोवती गुरूंच्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊ दे’, यासारख्या ३ प्रार्थना नामजप शोधण्यापूर्वी करायला सांगितल्या. नंतर गुरुकृपेने मला प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार योग्य नामजप शोधता येऊ लागला.
४ आ. सद्गुरु काकांनी सांगितल्यानुसार स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढून नामजप करतांना २० दिवसांत उपायांचा कालावधी न्यून होणे : सद्गुरु काकांनी सांगितल्यानुसार मी प्रतिदिन स्वतःभोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण काढून नामजपादी उपाय करत होतो. पुढे ‘माझा आध्यात्मिक त्रास न्यून होत आहे’, असे मला जाणवू लागले. २६.५.२०२४ ते १६.६.२०२४ या कालावधीत मला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार ‘ॐ, निर्गुण, महाशून्य, शून्य, आकाशतत्त्व, वायुतत्त्व, अग्नितत्त्व’ अशा प्रकारे निर्गुणापासून टप्प्याटप्प्याने निर्गुण-सगुण तत्त्वापर्यंतचे नामजप मिळू लागले. त्यामुळे प्रतिदिन मला आध्यात्मिक उपाय पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधीही टप्प्याटप्प्याने न्यून होत असल्याचे लक्षात आले.
४ इ. नामजप शोधायला बसल्यावर ‘प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार कोणता नामजप येईल ?’, हे प.पू. बाबांनी सूक्ष्मातून एका शब्दात सांगणे आणि प्रत्यक्षातही तोच नामजप मिळणे : पुढे माझ्या आध्यात्मिक त्रासांचे प्रमाण आणखी न्यून होत गेले. त्या काळातही प्रतिदिन प.पू. बाबांच्या चरणी माझ्याकडून त्रास न्यून होण्यासाठी प्रार्थना करणे चालूच होते. त्यामुळे नामजप शोधण्यासाठी बसल्यावर प.पू. बाबा मला ‘प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार कोणता नामजप येणार ?’, हे सूक्ष्मातून एका शब्दात सांगायचे. तरीही ‘वाईट शक्ती प.पू. बाबांच्या रूपात मला फसवू नयेत’, यासाठी मी सद्गुरु काकांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिदिन प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधूनच उपाय पूर्ण करत होतो आणि प्रत्यक्षात त्या त्या दिवशी मला प.पू. बाबांनी सूक्ष्मातून सांगितलेला नामजपच प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार मिळत असे. त्या वेळी प.पू. बाबा करत असलेले निरपेक्ष प्रेम आणि कृपा यांसाठी माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत असे.
४ ई. साधकाला आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याचे जाणवणे आणि त्याविषयी त्याने सद्गुरु काकांना कळवल्यावर त्यांनी सूक्ष्मातून परीक्षण करून होकार देणे : २४.६.२०२४ या दिवसापासून सलग ३ दिवस मला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार अग्नितत्त्वाचाच नामजप येत होता. एकदा नामजप करतांना ‘गुरुकृपेने आता माझा आध्यात्मिक त्रास न्यून झाला आहे’, अशी जाणीव मला सूक्ष्मातून झाली. त्यामुळे ही गोष्ट मी सद्गुरु काकांना कळवली. तेव्हा त्यांनी सूक्ष्मातून परीक्षण करून मला सांगितले, ‘‘तुमचा त्रास न्यून झाला असल्याचे जाणवते.’’
४ उ. सद्गुरु काकांचा वरील निरोप मिळताच साधकाला गुरुदेवांसह सद्गुरु काकांप्रती कृतज्ञता वाटणे : सद्गुरु काकांचा वरील निरोप मिळताच माझ्या मनात गुरुदेवांसह सद्गुरु काकांप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला. त्या वेळी मला गुरुदेवांचे वाक्य आठवले, ‘प्रारब्धानुसार तीव्र आध्यात्मिक त्रास असला, तरी गुरुकृपेनेच तीव्र प्रारब्धावर मात करता येते.’ खरेच ! माझ्यामध्ये आध्यात्मिक त्रासरूपी प्रारब्धावर मात करण्याची क्षमता नाही; पण गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु काकांचा संकल्प यांमुळेच केवळ १ मासामध्ये माझ्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता न्यून झाली आहे.
५. सद्गुरु काकांनी सांगितल्यानुसार प्रतिदिन आध्यात्मिक उपाय पूर्ण करतांना जाणवलेली सूत्रे
अ. आध्यात्मिक उपाय चालू करण्याच्या आरंभी मी साधारणतः ४ फूट अंतरावरून उपनेत्राविना (चष्म्याविना) प.पू. बाबांचे छायाचित्र पहातांना मला त्यांचे मुखकमल अस्पष्ट दिसायचे; पण स्वतःच्या डोळ्यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे इत्यादी आध्यात्मिक उपाय पूर्ण होत आल्यावर मला टप्प्याटप्प्याने प.पू. बाबांच्या छायाचित्रातील डोळ्यांच्या पापण्या, दोन्ही ओठ इत्यादी सुस्पष्ट दिसू लागले.
आ. जेव्हा स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होत जाते, तेव्हा प.पू. बाबांच्या छायाचित्राकडे पहातांना ते अधिकाधिक तेजस्वी दिसू लागतात आणि ‘त्यांच्या मुखकमलाकडे सतत पहात रहावे’, असे वाटते.
इ. स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होतांना जांभया आणि ढेकरा येण्याचे प्रमाण न्यून होते अन् स्वतःला हलकेपणा जाणवतो.
ई. उपायांनंतर स्वतःच्या चेहर्याभोवती तेज जाणवते.
उ. नामजप करतांना देवता, गुरुदेव आणि संत यांच्याप्रती कृतज्ञताभाव आपोआप जागृत होतो अन् काही वेळा डोळ्यांमध्ये भावाश्रूही येतात.
६. माझा आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याविषयीची चौकट २४.७.२०२४ या रात्री भोजनकक्षातील फलकावर वाचून संत आणि साधक यांनी शुभेच्छा दिल्यावर साधकाला जाणवलेली सूत्रे
अ. ‘गुरुतत्त्वाने माझ्या प्रगतीसाठी एक प्रकारे संकल्पच केला’, असे मला वाटून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
आ. त्या रात्री मी सेवा पूर्ण झाल्यावर खोलीत झोपायला गेलो. तेव्हा रात्री २ वाजेपर्यंत माझ्या मनात नामजप आपोआप चालू होता. नंतर सकाळी ६ वाजता मला आपोआप जाग आली.
इ. नेहमी रात्री ७ घंटे झोप झाल्यावर मिळणार्या समाधानाच्या तुलनेत त्या रात्री केवळ ४.०५ घंटे झोपूनही मन अधिक आनंदी आणि स्थिर जाणवत होते.
७. आश्रमातील संत आणि साधक यांच्यातील कुटुंबभावनेविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
अ. माझ्यापेक्षा संत आणि साधक यांनाच माझा (एका साधकाचा) आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याबद्दल पुष्कळ आनंद झाला अन् अनेक साधकांनी प्रेमाने मला गोड खाऊ दिला.
आ. एक साधक श्री. प्रदीप धाटकर म्हणाले, ‘‘दादा, काल फलकावर सूचना वाचल्यावर मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि कालपासून माझी भावजागृती होत आहे.’’ दुसर्या दिवशी त्यांचे हे भावपूर्ण शब्द ऐकतांना माझाही गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला.
इ. काही साधकांनी ‘८ दिवसांपासून तुझ्या चेहर्याकडे पाहून तुझा त्रास न्यून झाल्याचे जाणवत होते’, असे सांगितले.
ई. आश्रमात विविध प्रांतांतील आणि वेगवेगळी मातृभाषा असणारे साधक साधनेसाठी एकत्र रहात असले, तरी सर्वच साधकांमध्ये ‘गुरुबंधू’ आणि ‘गुरुभगिनी’ म्हणून कुटुंबभावना निर्माण झाली आहे. यामध्ये ‘निरपेक्षता’ आणि ‘इतरांचा विचार करणे’ हे ईश्वरी गुण असून त्यात कोणताही स्वार्थ नाही.
८. प्रार्थना
‘गुरुदेवा, आपणच मला सनातनच्या आश्रमात साधना करायची संधी देऊन आध्यात्मिक त्रासाच्या निवारणासाठी माझ्यावर कृपा केली आणि मला सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांद्वारे संकल्पस्वरूप आध्यात्मिक उपाय सांगून माझ्या त्रासाची तीव्रता न्यूनही केली. आता आपणच माझ्याकडून ग्रंथ-संकलनासह सर्वच सेवा आपल्याला अपेक्षित अशा झोकून देऊन, तळमळीने आणि शरणागतभावे करून घ्या अन् मला सतत कृतज्ञताभावात ठेवा, ही श्रीचरणी मनोभावे प्रार्थना आहे.’
– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०२४)
|