आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
पुणे – चीनमधील एच्.एम्.पी.व्ही.चा पहिला रुग्ण भारतात आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. सर्दी आणि खोकला यांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छतेची नियमावली पाळण्याची सूचनाही महाराष्ट्र सरकारने दिली आहे. आयोग्य विभागाने नियमावली घोषित केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ९ जानेवारी या दिवशी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीत एच्.एम्.पी.व्ही. विषाणूच्या संदर्भात त्याच्या तीव्रतेविषयीही चर्चा होणार आहे. सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये, यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे, याविषयी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याशीही याविषयी चर्चा करू. राज्य सरकार ज्या सूचना करते, त्यांचे पालन नागरिकांनी काटेकोरपणे करावे.’’