सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – स्व. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शहरी भागासह ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्ण येत असतात. येणार्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा देण्यासह त्यांच्यावर चांगले उपचार करावेत. याविषयी कोणत्याही तक्रारी येऊ देवू नका, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्व. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाची पहाणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
मंत्री आबिटकर म्हणाले, ‘‘रुग्णालयात येणार्या प्रत्येक रुग्णावर उपचार करावेत. त्यांना खासगी रुग्णालयात पाठवू नयेत. रुग्णालय स्वच्छतेवर भर द्यावा. रुग्णालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रमाणीकरणासाठी येणारी देयके वेळेत प्रमाणित करून द्यावी. रुग्णालयात कामासाठी येणार्यांना हेलपाटे मारायला लावू नका. त्यांची कामे तातडीने करा. समाजसेवक, अधीक्षकांनी रुग्णांसाठी असणारे हक्क आणि सुविधा यांची माहिती देण्यासह त्यांना स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात लवकरात-लवकर उपचार कसे मिळतील, यासाठी काम करावे.’’
संपादकीय भूमिकाअसे का सांगावे लागते ? रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा देणे, हे रुग्णालय प्रशासनाचे कर्तव्यच आहे. यामध्ये कुचराई होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |