धारगळ (गोवा) येथील ‘सनबर्न’मध्ये उपस्थित राहिलेल्या देहली येथील युवकाचा मृत्यू

अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २९ डिसेंबर (वार्ता.) – धारगळ येथे चालू असलेल्या ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल’ला उपस्थित राहिलेल्या देहली येथील एका युवकाचा म्हापसा येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. संबंधित युवकाचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबरपर्यंत ‘सनबर्न’ महोत्सव होत आहे. देहली येथील युवक २८ डिसेंबर या दिवशी या महोत्सवात पाश्चात्त्य संगीताच्या तालावर तो पुष्कळ नाचला होता; मात्र नंतर तो बेशुद्ध झाला. उत्तर पश्चिम देहलीतील रोहिणी येथील करण कश्यप असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमाच्या कालावधीत रात्री ९.४५ च्या सुमारास तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला म्हापसा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले; मात्र त्याचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. युवकाचा मृतदेह गोवा वैद्यकीय महविद्यालयाच्या रुग्णालयात शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे. काही गैरप्रकार आढळल्यास आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

‘सनबर्न’ महोत्सव चालू करण्यापूर्वी आयोजकांकडून होमहवन

‘सनबर्न’चे आयोजक हरिंद्रा सिंह यांनी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी होमहवन करून महोत्सवाचा शुभारंभ केला. माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांनी याविषयीची माहिती माध्यमांना दिली. ‘हरिद्रा सिंह यांच्या आमंत्रणावरून मी हवनाला उपस्थिती लावली; मात्र मी ‘सनबर्न’ला कधीच जात नाही’, असे स्पष्टीकरण दीपक कळंगुटकर यांनी दिले.

‘सनबर्न’मध्ये पहिल्याच दिवशी ध्वनीप्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा आरोप

ध्वनीमापक यंत्रणा मुद्दामहून चुकीच्या ठिकाणी बसवल्याचा आरोप

‘सनबर्न’च्या पहिल्याच दिवशी (२८ डिसेंबर या दिवशी) मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. धारगळ पंचायतीने ‘सनबर्न’ला ‘ना हरकत’ दाखला दिल्यानंतर ग्रामस्थांनी ‘सनबर्न’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होऊन अनेक अटींसह ‘सनबर्न’ महोत्सवाला न्यायालयाने मान्यता दिली होती आणि या प्रकरणी न्यायालयाने ७ जानेवारी या दिवशी पुढील सुनावणी ठेवली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ‘सनबर्न महोत्सवात ध्वनीप्रदूषण होत आहे कि नाही’ हे तपासण्यासाठी जागोजागी ध्वनीमापक यंत्रणा बसवली आहे. ‘सनबर्न’ला विरोध करणार्‍यांनी ध्वनीमापक यंत्रणा कुठे बसवली आहे ? याची पहाणी केली असता त्यांना ती यंत्रणा मुद्दामहून चुकीच्या जागी बसवल्याचे लक्षात आले आहे. विरोधकांनी रेडकर रुग्णालयाला भेट दिली असता त्यांना ध्वनीमापक यंत्रणा रुग्णालयाच्या इमारतीच्या मागे एका कोपर्‍यात बसवल्याचे दिसून आले. मोठ्या आवाजाची नोंद होऊ नये, यासाठी यंत्र मुद्दामहून चुकीच्या जागी बसवल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. तसेच ओशेलबाग येथे लोकवस्तीत बसवण्यात आलेली ध्वनीमापन यंत्रणा बंद असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. ‘सनबर्न’च्या आयोजकांनी न्यायालयात सांगितल्याप्रमाणे लोकांना त्रास होऊ नये, यासाठी उपाययोजना केली आहे कि नाही याची पहिल्या दिवसापासून पहाणी करावी, या मागणीसाठी याचिकादार भारत बागकर, महेश प्रभुदेसाई, महादेव पटेकर आणि रोहिदास हरमलकर यांनी उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांची भेट घेतली. उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी ‘आमचे पथक आयोजकांवर नजर ठेवून आहे’, असे याचिकादारांना सांगितले.