संपादकीय : घुसखोरांवर उपाय हवा !

प्रतीकात्मक छायाचित्र

भारतात घुसखोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतात असे बहुधा एकही राज्य शेष नाही, जेथे बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुसलमान यांनी घुसखोरी केलेली नाही. बांगलादेशी भारतात कशा प्रकारे घुसतात, हे दाखवणारे अनेक व्हिडिओज मध्यंतरी मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. त्यावरून सीमारेषेवर सुरक्षायंत्रणा किती ढिसाळ आहे, हे सर्वांनीच पाहिले. सीमा भागांमध्ये काही ठिकाणी पैसे देऊन ही घुसखोरी केली जाते. हे बांगलादेशी घुसखोर भारतात घुसखोरी करून जरी वेगवेगळ्या राज्यांत पोचले, तरी त्यांना तेथे आधारकार्ड, रेशनकार्ड आदी भारतीय ओळखपत्रे कशी मिळतात ?, हा प्रश्‍न नेहमीच उपस्थित केला जातो. सध्या देहलीत बांगलादेशी घुसखोर आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्या विरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर घुसखोरांची भारतीय ओळखपत्रे बनवणार्‍या एका मोठ्या टोळीतील ११ जणांना अटक करण्यात आली. या टोळीत आधारकार्ड ऑपरेटर आणि तांत्रिक तज्ञ यांचाही समावेश आहे. सध्या देहली हे बांगलादेशी घुसखोरांसाठी माहेरघर बनले आहे. बांगलादेशातून भारतात आलेले घुसखोर सीमा ओलांडल्यावर देहली गाठतात. त्यांना देहलीत स्थायिक होण्यासाठी ही ११ जणांची टोळी साहाय्य करत असे. या घुसखोरांना तेथे स्थायिक होण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ही टोळी बनवून देत असे. या टोळीमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत ? आणि त्यांच्या कारवायांची व्याप्ती किती मोठी आहे ?, याविषयी अजून माहिती यायची आहे. भारतीय नागरिकांना आधारकार्ड किंवा रेशनकार्ड मिळवायचे असले, तर त्यांना अनेक प्रशासकीय प्रक्रियेतून जावे लागते, अनेक कागदपत्रे जोडावी लागतात. त्यानंतर आधारकार्ड किंवा पॅनकार्ड आपल्या हातात मिळतात. असे असतांना बांगलादेशी घुसखोरांना ही कागदपत्रे इतक्या सहजपणे कशी मिळू शकतात ? पुणे येथे रोहिंग्याने घर बांधल्याची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती.

घुसखोर एवढ्या बिनधास्तपणे भारतात कसे वावरू शकतात ? हे येथील व्यवस्थेचे मोठे अपयश आहे. निव्वळ काही पैशांकरता घुसखोरांसाठी कागदपत्रे बनवून देशाशी प्रतारणा करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. मध्यंतरी आलेल्या एका वृत्तानुसार झारखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये तेथील लोकसंख्येपेक्षा अधिक आधारकार्ड असल्याचे आढळून आले आहे. अलीकडेच झारखंडमधील निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला मोठे यश मिळाले होते. या यशामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा वाटाही मोठा आहे, असे सांगितले जात आहे. झारखंड, बंगाल, देहली आदी राज्यांमध्ये तेथील राजकारणावर थेट परिणाम करण्याची क्षमता या बांगलादेशी घुसखोरांनी निर्माण केली आहे. सुरक्षायंत्रणांनी सादर केलेल्या अनेक अहवालांमध्ये हे बांगलादेशी घुसखोर भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या घुसखोरीवर आळा घालण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. घुसखोरांवर कारवाई करतांना अनेक अडथळे येतील किंवा मोठ्या प्रमाणात विरोध होईल. हा विरोध निधर्मी म्हणवून घेणारे राजकीय पक्ष, तसेच घुसखोरांचे धर्मबांधव यांच्याकडून होईल. त्या वेळी तो मोडून काढण्यासाठी सरकारने आतापासून सिद्धता ठेवावी. वास्तविक सरकारने घुसखोरांविषयी एवढी आक्रमक भूमिका घ्यावी की, भारतात घुसखोरी करण्याचा विचारही या घुसखोरांच्या मनात येणार नाही. घुसखोरीचे उग्र रूप धारण केले असता सरकारने आता त्याच्या विरोधात कठोर होणे आवश्यक आहे !

घुसखोरीची समस्या मुळापासून हटवण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !