
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकताच सनातन धर्म आणि परंपरा यांच्याशी संबंधित एक महत्त्वाचा अन् ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यात प्रसारित केल्या जाणार्या सरकारी अधिसूचना, राजपत्र, उद्घाटन फलक, शिलालेख आदींवर दिनांक आणि वर्ष यांसह हिंदु पंचांगानुसार (विक्रम संवत) महिना अन् तिथी (उदा. फाल्गुन, शुक्ल पक्ष/ कृष्ण पक्ष) यांचा उल्लेख करण्याचा आदेश त्यांनी दिला. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांना सुसंगत असा कौतुकास्पद निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे अभिनंदन ! मूळ भारतीय संस्कृती रक्षणासाठी देशभरातील भाजपशासित राज्यांमध्ये काही ना काही प्रयत्न चालू आहेत. भारताची गौरवशाली परंपरा परकीय आक्रमकांनी पुसून टाकण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले, तरीही महान सनातन हिंदु धर्म पूर्णपणे नष्ट करण्यात त्यांना यश आले नाही. सनातन हिंदु धर्माचे हेच माहात्म्य आहे. तो कालातीत आहे. परकियांच्या खुणा पुसण्यासाठी, त्यांची स्थाने नष्ट करण्यासाठी हिंदू मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या स्पष्ट मागणी करत आहेत, हे अलीकडे घडत असलेल्या घटनांमधून लक्षात येते. हिंदूंना त्यांच्याच देशात त्यांच्याच गौरवशाली ऐतिहासिक ठेव्यासाठी झगडावे लागणे, हे स्वधर्म, स्वाभिमान विसरलेल्या गांधी-नेहरूप्रणीत आधुनिक व्यवस्थेचे मूळ आहे. हिंदुत्वनिष्ठांना हिंदूंना जागृत करण्यासाठी मोठा कालावधी त्यांचे प्रबोधन करावे लागले. त्यामुळे आता कुठे हिंदू जागे होऊन स्वतःच्या गौरवशाली परंपरेसाठी लढा देत आहेत. त्यासाठी हिंदुत्वनिष्ठ नेते त्यांना साथ देत असले, तरी कासवाच्या गतीने आकाशाला गवसणी घालण्यासाठी आणखी मोठा कालावधी खर्च करावा लागू शकतो. हे लक्षात घेता भारताला अभेद्य, नित्य आणि चिरंतन अशा सनातन हिंदु धर्माचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी धिमी नाही, तर झपाझप पावले टाकून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करून रात्रंदिवस प्रयत्न करावे लागणार आहेत.
मुख्यमंत्री धामी यांनी अवैध मशिदी बंद करण्याचाही सपाटा लावला आहे. धार्मिक राज्य असलेल्या उत्तराखंडमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मशिदी उभ्या रहातात काय आणि त्या अनेक वर्षे चालू रहातात काय ? भारताच्या स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षे उत्तराखंडसह भारतभरात अगणित अनधिकृत मशिदी उभ्या राहिल्या आणि अवैध कारवायांचे त्या केंद्रस्थान ठरल्या. त्यांच्यावर यदाकदाचित् कारवाई झाल्यावर १-२ बातम्या देऊन त्याचा गाजावाजा न करणार्या डाव्या विचारसरणीच्या प्रसिद्धीमाध्यमांमुळे त्याकडे आवश्यक तेवढ्या गांभीर्याने पाहिले गेले नाही; मात्र आता थोड्याफार प्रमाणात का होईना, काही पावले उचलली जात आहेत. हे अर्थातच चांगले आहे; पण याला आवश्यकता आहे ती गतीची !
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपचे सरकार विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. देशातील १५ राज्यांत भाजपचे सरकार आहे, तर ६ राज्यांमध्ये भाजप हा सरकारमधील एक घटक आहे. उत्तराखंडमध्ये हिंदु पंचांगांच्या तिथीचा उपयोग शासकीय कागदपत्रांवर होऊ शकतो, तर भाजपशासित प्रत्येक राज्यात तो सहजतेने होऊच शकतो, असे हिंदूंना वाटते. हिंदूंनी ज्या विश्वासाने भाजपला निवडून दिले आहे, ते पहाता त्याने ‘हिंदुहितकारक निर्णय घेण्यातील अडथळे दूर करून चांगल्या निर्णयांची घोडदौड गतीने करावी’, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे.
हिंदु धर्माचे पुनर्वैभव त्याला मिळवून देण्यासाठी भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करत गतीने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा ! |