संपादकीय : सुनीता विल्यम्स यांनी रचलेला नवा इतिहास ! 

सुनीता विल्यम्स

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अनुमाने ९ मास अंतराळात राहिल्यानंतर १९ मार्चला त्यांचे साथीदार बुच विल्मोर यांच्यासह पृथ्वीवर सुरक्षित परतून त्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. सुनीता विल्यम्स ‘ड्रॅग कॅप्सूल’मधून बाहेर येताच त्यांचे सहकारी बुच विल्मोर, अलेक्झांडर गोर्बुनोव्ह आणि निक हेग यांनी त्यांचे स्वागत केले, तसेच सुनीता यांच्या गुजरातमधील झुलासन या मूळ गावी दिवाळीच साजरी करण्यात आली. सुनीता यांच्यासह ४ अंतराळविरांनी सुखरूपपणे पृथ्वीवर परतणे, ही मोठी महत्त्वपूर्ण आणि सुवर्ण अक्षरांनी नोंदवावी, अशी कामगिरी आहे. ‘नासा’, इलॉन मस्क यांचे ‘स्पेस एक्स’, तसेच जगातील अंतराळ संशोधक आणि स्वतः सुनीता विल्यम्स, त्यांचे साथीदार हे अभिनंदनास पात्र आहेत. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार कसे सुखरूप परत येत आहेत, याकडे जगभरातील सर्वच नागरिकांचे विशेष लक्ष होते.

सुनीता यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, ती मानवाच्या विजयाची आहे; ‘इच्छा तेथे मार्ग’ या वचनाला धरून आहे. सुनीता आणि बुच विल्मोर यांनी अंतराळ प्रयोगशाळेत ९ मासांहून अधिक काळ राहून स्वतःची मोहीम फत्ते केली. ५ जून २०२४ या दिवशी त्यांना अनुमाने १ आठवड्यासाठी अवकाशात पाठवण्यात आले होते; पण ‘स्टारलाइनर कॅप्सूल’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना ९ मास अवकाशात रहावे लागले. आता सुनीता आणि बुच यांच्यासमोर अनेक शारीरिक अन् मानसिक आव्हाने आहेत. अवकाशात ९ मास घालवल्यानंतर त्यांची हाडे आणि स्नायू लक्षणीयरित्या खराब झाली आहेत अन् आता त्यांना ‘रेडिएशन एक्सपोजर’, तसेच दृष्टी न्यून होणे, यांसारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.

दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि शोध घेण्याची आवड !

सुनीता विल्यम्स

सुनीता विल्यम्स या ‘नासा’मध्ये एक उत्कृष्ट कारकीर्द असलेल्या अंतराळवीर आणि एक उल्लेखनीय व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांनी केवळ अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले नाही, तर जगभरातील असंख्य व्यक्तींसाठी प्रेरणा म्हणून काम केले आहे. त्यांचा एका छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतचा प्रवास हा दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि शोध घेण्याची आवड यांचा पुरावा आहे अन् त्यामुळेच त्या आज अंतराळवीर म्हणून उच्च स्थानी आहेत. सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ या दिवशी युक्लिड, ओहायो, अमेरिका येथे झाला. तथापि त्यांच्या भारतीय वंशामुळे त्यांचा भारताशी संबंध आयुष्यभर कायम राहिला. त्यांचे वडील दीपक पंड्या एक ‘न्यूरोएनाटॉमिस्ट’ होते आणि आई बोनी पंड्या या गणित अन् विज्ञान यांत तज्ञ होत्या. सुनीता अशा कुटुंबात वाढल्या, जिथे शिकण्याची आवड आणि सभोवतालच्या जगाविषयी कुतूहल निर्माण झाले. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांना आकार देण्यात त्यांच्या कुटुंबाची नैतिक मूल्ये आणि पाठिंबा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

सुनीता विल्यम्स यांचा अंतराळवीर होण्याचा प्रवास वर्ष १९९८ मध्ये चालू झाला, जेव्हा त्यांची ‘नासा’द्वारे ‘अंतराळवीर उमेदवार’ म्हणून निवड झाली. नौदल वैमानिक म्हणून सुनीता यांची पार्श्वभूमी आणि भौतिक शास्त्रात त्यांचे झालेले शिक्षण यांमुळे त्या अवकाश संशोधनासाठी एक आदर्श उमेदवार बनल्या. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा विक्रमही सुनीता यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यांच्या नावावर सर्वाधिक, म्हणजे ७ वेळा आणि अधिक वेळ (५० घंटे ४० मिनिटे) ‘अंतराळात चाललेली महिला’ असा विक्रम आहे. याचसमवेत सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या संपूर्ण अंतराळ उड्डाणाच्या कारकीर्दीत एकूण ३२२ दिवस अंतराळात घालवले, ज्यामुळे त्या एका अमेरिकन अंतराळविराने अंतराळ कक्षेत घालवलेल्या ‘सर्वांत अनुभवी अंतराळवीर’ बनल्या आहेत. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी ३२ व्या मोहिमेच्या ‘फ्लाईट इंजिनीअर’, तसेच ३३ व्या मोहिमेच्या ‘कमांडर’ म्हणून काम केले आहे. वर्ष १९८९ मध्ये त्यांना ‘विंग्स ऑफ गोल्ड’ पुरस्कार मिळाला. या सगळ्यातून सुनीता यांची एक अंतराळवीर म्हणून त्यांचे अष्टपैलूत्व दर्शवते.

मौल्यवान माहितीचे योगदान !

सुनीता विल्यम्स यांच्या काळातील सर्वांत उल्लेखनीय पैलूंपैकी एक, म्हणजे त्यांचे वैज्ञानिक संशोधनाचे समर्पण. सुनीता यांनी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि भौतिक विज्ञान यांसह विविध क्षेत्रांत प्रयोग केले अन् अनेक संशोधकांना मौल्यवान माहितीचे योगदान दिले. त्यांच्या ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’वरील कार्यामुळे मानवी शरीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या विस्तारित कालावधीला कसा प्रतिसाद देते, हे समजून घेण्यास साहाय्य मिळाले. त्यामुळे भविष्यातील दीर्घ कालावधीच्या अंतराळ मोहिमांसाठी मार्ग मोकळा झाला. त्यांच्या वैज्ञानिक योगदानाच्या व्यतिरिक्त सुनीता विल्यम्स अंतराळात पोचण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी प्रसिद्ध झाल्या. त्यांनी सामाजिक माध्यमे आणि ‘व्हिडिओ कम्युनिकेशन’चा वापर लोकांशी संवाद साधण्यासाठी केला अन् विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, तसेच गणितामध्ये भवितव्य घडवण्यासाठी प्रेरित केले.

असंख्य विद्यार्थ्यांना प्रेरणा ! 

सुनीता विल्यम्स यांच्या दीर्घ कालावधीच्या अंतराळ उड्डाणाच्या मोहिमांमुळे शारीरिक परिणाम किती आणि कसा होतो, याविषयीही मौल्यवान माहिती मिळवली आहे. ही माहिती भविष्यातील अंतराळ मोहिमांच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण आहे. सुनीता यांनी मिळवलेल्या विविध माहितीमुळे ‘स्पेसवॉक’ अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम कसे करता येईल, यासाठी साहाय्य होणार आहे. विल्यम्स यांच्या अंतराळात पोचण्याच्या प्रयत्नांमुळे असंख्य विद्यार्थ्यांना ‘विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित’ या क्षेत्रांमध्ये भवितव्य घडवण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. सुनीता विल्यम्स यांची ‘नासा’मधील कारकीर्द अधिकृतपणे संपली असली, तरी अंतराळ संशोधनावरील त्यांचा प्रभाव कायम रहाण्याची शक्यता आहे. अंतराळ संशोधनात भारतही अवघड; पण अचूक कामगिरी करण्यात अव्वल आहे. ‘इस्रो’ने नुकतीच ‘चंद्र मोहीम ५’ हाती घेतली आहे. विविध प्रकारचे उपग्रह अचूक पाठवण्यात ‘इस्रो’ आता तज्ञ झाली आहे. सुनीता यांचे अनुभव आणि अभ्यास भविष्यातील ‘नासा’ अन् ‘इस्रो’ यांच्या अंतराळ मोहिमांच्या विकासास हातभार लावेल, यात तीळमात्र शंका नाही !

सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात जाऊन केलेले अमूल्य वैज्ञानिक संशोधन, हे त्यांचे उच्च समर्पण दर्शवते !