‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ म्हणून हवेची नोंद
मुंबई – मुंबई शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५९ वर पोचला आहे. १५१ ते २०० यामधील निर्देशांक ‘खराब’ म्हणून गणला जातो. शहरातील काही भागांतील हवा सातत्याने ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली जात आहे. यामध्ये कुर्ला, कलिना (सांताक्रूझ), भायखळा, वरळी, माझगाव या परिसरांचा समावेश आहे. बोरिवलीमध्ये तर साधारण १० ते १५ दिवस ‘वाईट’, तर काही दिवस सलग ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे. येथील हवेचा निर्देशांक हा नोव्हेंबरपासून २०० ते ३०० पर्यंत म्हणजे अतिशय खराब म्हणून नोंदवला जात आहे.
मुंबईच्या हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील पी.एम्. (पार्टिक्युलेट मॅटर) २.५ इतके नोंदवण्यात आले आहे. पी.एम्. अर्थात् पार्टिक्युलेट मॅटर हे हवेतील प्रदूषण मोजण्याचे मापक आहे. शहरात वारे वहात नसल्यामुळे प्रदूषके साचून रहात आहेत. बांधकामे, तसेच वाहतुकीची कोंडी यांमुळेही हवेचे प्रदूषण वाढले आहे.

मुंबई महापालिकेकडून विशेष उपाययोजनांना प्रारंभ !
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. मार्गदर्शक तत्त्वांची कार्यवाही न करणार्या २८ बांधकामांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. रस्ते धुण्यासाठी १०० टँकर तैनात करण्यात आले आहेत. २४ प्रशासकीय विभागांमध्ये ‘ट्रक माऊंट फॉग मिस्ट कॅनॉन’ संयंत्रांद्वारे दोन सत्रांमध्ये पाणी फवारणी केली जात आहे. बांधकाम, पाडकाम, खोदकाम चालू असलेल्या ठिकाणी पाणीफवारणी केली जात आहे. रस्ते, पदपथ स्वच्छतेसाठी ई-स्वीपर संयंत्राचा अवलंब करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकादेशाच्या आर्थिक राजधानीत हवेचे प्रदूषण रोखता न येणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! |