|
प्रयागराज – महाकुंभपर्वात भाविकांच्या सुरक्षेचे सर्वांत मोठे दायित्व पार पाडणार्या पोलिसांना सर्वार्थाने कर्तव्यदक्ष बनवण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने कंबर कसली आहे. पोलिसांना शारीरिक सक्षमतेसह मानसिक स्तरावरही सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी लिखित परीक्षा घेतली जात आहे. उत्तरप्रदेश राज्याचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत कुमार यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. असा प्रयोग राज्यात प्रथमच करण्यात येत आहे. पोलिसांची सिद्धता किती आहे ?, हे पहाण्यासाठी, तसेच त्यांना सर्व आव्हानांचा सामाना करण्यास सक्षम बनवण्यासाठी शिकवणीचे विशेष सत्र आणि परीक्षा घेतली जात आहे.
या प्रशिक्षण सत्रात पोलिसांना आपत्कालीन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, भाविकांशी कसे वर्तन ठेवावे ?, यासह महाकुंभपर्वाविषयी आध्यात्मिक धडे दिले जात आहेत. या प्रशिक्षणानंतर त्यांची लेखी परीक्षा घेतली जात आहे. यात १०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देण्यात येत असून त्यात २० प्रश्न विचारण्यात आले आहेत. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी १ घंटा इतका वेळ देण्यात निश्चित करण्यात आला आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणार्या पोलिसांना पुन्हा ३ दिवसांच्या प्रशिक्षण सत्रानंतर पुन्हा परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. ही परीक्षा सर्व पोलिसांसाठी अनिवार्य आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची ७ पदरी सुरक्षा व्यवस्था !महाकुंभपर्वासाठी येणार्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची ७ पदरी सुरक्षा व्यवस्था असणार आहे, अशी माहिती पोलीस उपमहासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. महाकुंभच्या आतील भागात ४ पदरी सुरक्षा असेल. सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय प्रवशांची पडताळणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासह ए.आय. आधारित सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि अँटीड्रोन यंत्रणा आदींचाही वापर करण्यात येणार आहे. सामाजिक माध्यमांचा वापर करणार्यांवरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. |