मार्गशीर्ष कृष्ण नवमी (२४.१२.२०२४) या दिवशी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना ६५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. श्रीमती मिथिलेशकुमारी वेद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वय ६६ वर्षे)
१ अ. साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देणे : ‘वर्ष २००० मध्ये आधुनिक वैद्य पांडुरंग मराठेकाका उत्तर भारतात मार्गदर्शन करण्यासाठी येत होते. तेव्हा ते आमच्या अयोध्या येथील घरी येत असत. ते साधकांची साधना चांगली होण्यासाठी साधकांना प्रत्येक पैलू चांगल्या प्रकारे सांगत होते.
१ आ. साधकांना विनम्रतेने त्यांच्या चुका समजावून सांगणे : अयोध्या येथे शिबिर असतांना साधकांकडून काही चुका होत असत. तेव्हा आधुनिक वैद्य पांडुरंग मराठेकाका अत्यंत विनम्रतेने साधकांना त्यांच्या चुका समजावून सांगत होते.
१ इ. स्वतःची प्रकृती ठीक नसतांनाही रुग्णांशी सहजतेने बोलून त्यांना औषध देणे : एकदा वर्ष २०१९ मध्ये माझे यजमान (डॉ. नंदकिशोर वेद)(आताचे सनातनचे १०७ वे (समष्टी) संत पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद) यांची प्रकृती बिघडली होती. त्या वेळी मला आधुनिक वैद्य मराठेकाकांशी बोलण्याची इच्छा झाली. तेव्हा यजमानांनी मला सांगितले, ‘‘मराठेकाका घरी आहेत आणि त्यांची प्रकृतीही ठीक नाही. अशा परिस्थितीत मी त्यांना माझ्या प्रकृती अस्वास्थ्याविषयी कसे विचारू ?’’ त्या वेळी यजमानांना अत्यंत वेदना होत होत्या आणि येथे अयोध्येतील आधुनिक वैद्यांच्या औषधाने काहीच गुण येत नव्हता. नंतर यजमानांनी प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना करून मराठेकाकांना स्वतःच्या प्रकृतीविषयी सांगितले. तेव्हा मराठेकाकांनी माझ्या यजमानांना लगेच औषध सांगितले आणि ते सहजतेने बोलल्यामुळे यजमानांना चांगले वाटले.
२. सौ. क्षिप्रा जुवेकर
(आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४० वर्षे)
२ अ. आधुनिक वैद्य मराठेकाका यांच्यामुळे साधनेला आरंभ होणे : मला वयाच्या १८ व्या वर्षापासून आधुनिक वैद्य मराठेकाकांचा सत्संग लाभला. ते अयोध्येला साधकांच्या घरी संपर्क करण्यासाठी जात होते. तेव्हा मला साधनेविषयी तेवढे ठाऊक नव्हते. माझ्या घरी आई (आताच्या श्रीमती मिथिलेशकुमारी वेद), बाबा (पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद) आणि माझी मोठी बहीण (सौ. कनुप्रिया श्रीवास्तव, पूर्वाश्रमीची कु. कनुप्रिया वेद) साधना करत होते. मराठेकाका घरी आल्यावर आम्हाला सर्वांना वेळ देऊन साधनेविषयी सांगत होते. मी सत्संगात आणि साधकांच्या संपर्कात असल्यामुळे माझ्यामध्येही साधनेविषयी गांभीर्य निर्माण झाले.
२ आ. दूरचा प्रवास करून घरी आल्यावर न थकता साधकांच्या शंकांचे निरसन करणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे ! : त्या वेळी सनातनचे काही ग्रंथ प्रकाशित झाले होते. तेव्हा मला वाचनाची पुष्कळ आवड होती. एकदा मी एक ग्रंथ वाचतांना माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. त्याच रात्री मराठेकाका आमच्या घरी निवासासाठी आले. ते दूरचा प्रवास करून आले होते आणि अत्यंत थकलेले होते; परंतु ‘मी प्रश्न काढून ठेवले आहेत’, हे त्यांना समजल्यावर त्यांनी विश्रांती न घेता माझ्या शंकांचे निरसन केले.
त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मी तर एवढी साधनाही करत नाही, तरीही मराठेकाका एवढे थकलेले असूनही मला वेळ देत आहेत.’ माझ्यासाठी ही फार वेगळी गोष्ट होती. ‘व्यवहारात कुणीही स्वतःचा स्वार्थ असल्याविना कुणाला एवढा वेळ देत नाही’, असा माझा अनुभव होता.
२ इ. साधिकेच्या वडिलांच्या आजारपणात येणार्या अडचणी जाणून घेणे आणि साधिकेच्या कुटुंबियांना प्रेमाने आधार देणे
२ इ १. साधिकेच्या वडिलांच्या कर्करोगासारख्या दुर्धर आजारात आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन देणे : आम्हाला कधी एखादी शारीरिक अडचण आल्यास आणि त्या वेळी आम्ही कुठेही असलो, तरी मराठेकाका आम्हाला मार्गदर्शन करतात. ‘कोरोना महामारीच्या कालावधीत काकांमध्ये अनेक पालट झाले आहेत’, असे आमच्या लक्षात आले. त्या कालावधीत त्यांना सतत भ्रमणभाष येत होते. त्या वेळी आम्हीही त्यांना आमच्या अडचणींसाठी संपर्क करत होतो. ते प्रत्येक वेळी आम्हाला आधार देत होते.
त्या वेळी माझ्या बाबांची (पू. नंदकिशोर वेद यांची) प्रकृती अकस्मात् अधिकच बिघडू लागली होती. आम्ही बाबांच्या प्रदीर्घ कर्करोगासारख्या आजारात आणि नंतर त्यांचा मृत्यू या गंभीर प्रसंगात मराठेकाकांमुळे स्थिर राहू शकलो. बाबांच्या आजारपणात आमच्या भावना लक्षात घेऊन मराठेकाकांनी आम्हाला आध्यात्मिक स्तरावर आधार दिला.
२ इ २. श्री गुरूंप्रती श्रद्धा वाढवण्यास सांगणे : आम्ही बाबांच्या आजारपणात काळजीमुळे मराठेकाकांना पुष्कळ प्रश्न विचारत होतो. तेव्हा ते आम्हाला प्रेमाने श्री गुरूंप्रती श्रद्धा वाढवण्यासाठी सांगत असत. ‘आपण उगाचच एवढी काळजी करत होतो’, असे आम्हा कुटुंबियांना त्यांच्याशी बोलल्यानंतर वाटत असे.
‘साधक आधुनिक वैद्यच समाजाला योग्य चिकित्सा देऊ शकतात’, हे अनेक प्रसंगांत आम्ही अगदी जवळून अनुभवले आहे. माझे यजमान श्री. प्रशांत जुवेकर यांचे मोठे शस्त्रकर्म नाशिकमध्ये झाले. तेव्हाही मराठेकाका सतत त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करून आम्हाला आधार देत होते.
३. सौ. क्षिप्रा जुवेकर आणि श्री. प्रशांत जुवेकर, जळगाव सेवाक्रेंद्र
३ अ. आधुनिक वैद्य मराठेकाका यांच्यात जाणवलेले पालट
१. आता ‘आधुनिक वैद्य मराठेकाकांमधील प्रीती पुष्कळ वाढली आहे’, असे आम्हाला जाणवते.
२. ‘प्रत्येक रुग्णाचा त्रास म्हणजे त्यांना स्वतःलाच होणारा त्रास आहे’, असा भाव निर्माण होऊन ते समर्पणभावाने आणि एकाग्रतेने रुग्णावर औषधोपचार करतात.
३ आ. प्रत्येक साधकाचा वैद्यकीय अहवाल पाहून स्वतःचे मत अत्यंत तळमळीने सांगणे : आजही जळगाव सेवाकेंद्रातील साधक असो किंवा प्रसारातील कुणीही साधक असो, त्यांना ‘एखाद्या मोठ्या व्याधीविषयी कुणाचे मार्गदर्शन घ्यावे’, असा प्रश्न पडतो, तेव्हा त्यांच्या समोर प्रथम मराठेकाकांचेच नाव येते. मराठेकाका तत्परतेने साधकाचा वैद्यकीय अहवाल पाहून त्याविषयी अत्यंत तळमळीने सांगतात.
मराठेकाका अनेक संतांवरही उपचार करतात. ते प्रत्येक रुग्णाला तेवढ्याच आत्मीयतेने पहातात. ‘संतांना अधिक एकाग्रतेने तपासणे आणि अन्य रुग्णांना वरवरचे तपासणे’, असे त्यांनी कधीच केले नाही.
‘श्री गुरूंच्या कृपेने आधुनिक वैद्य मराठेकाकांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे’, याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
सर्व सूत्रांचा दिनांक : (१२.१२.२०२४)