मॉस्को – रशियाच्या कर्करोगावरील लसीच्या घोषणेनंतर जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आशा निर्माण झाली आहे. या लसीची किंमत अनुमाने २ लाख ५० सहस्र रुपये असेल. रशियन नागरिकांना ही लस निःशुल्क मिळणार आहे; मात्र ही लस अन्य देशांमध्ये कधी उपलब्ध होणार, याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रशियाच्या ‘रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटर’चे संचालक आंद्रेई कॅप्रिन यांनी, ‘रशियाचा हा शोध शतकातील सर्वांत मोठा शोध आहे’, असे म्हटले आहे.
भारतातील सर गंगाराम हॉस्पिटलमधील कर्करोग विभागाचे अध्यक्ष डॉ. श्याम अग्रवाल म्हणाले की, अशा प्रकारची लस खरोखरंच अस्तित्वात आली, तर त्याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणांना लाभ होईल; मात्र ‘या लसीचा कर्करोगांच्या रुग्णांवर प्रयोग झाला आहे का ?’, ‘याचे किती डोस घेणे आवश्यक आहे ?’, याविषयी काहीच माहिती समोर आलेली नाही. ती आल्यावरच या लसीची खर्या अर्थाने ओळख होऊ शकेल.