प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध आखाड्यांकडून काढण्यात येणार्या ‘पेशवाई’च्या निमित्ताने…
कुठल्याही कुंभपर्वाच्या अगोदर परंपरेप्रमाणे विविध आखाड्यांच्या साधू-संतांकडून कुंभक्षेत्री प्रवेश करण्यासाठी शस्त्रास्त्रांसह काढण्यात येणारी मिरवणूक म्हणजे पेशवाई ! मोगलांशी युद्ध करून त्यांचा निःपात करणार्या साधूंच्या अफाट सामर्थ्याची साक्ष देणार्या या पेशवाईची परंपरा अलौकिक अशीच आहे !
१. मोगल शासक जहांगीरचा हिंदुद्वेष !
मोगल शासक अकबरचा मुलगा जहांगीर हा इ.स. १६०५ मध्ये प्रयागराजचा (तेव्हाच्या अलाहाबादचा) शासक बनला. जहांगीरने स्वतःचा प्रभाव दाखवण्यासाठी स्वतःच्या नावाचे नाणे सिद्ध करून ते चलनात आणले. इतर मोगल आक्रमकांप्रमाणेच जहांगीरनेही हिंदूंचा छळ चालू केला. त्याने प्रयागराज येथील हिंदूंचा अतीप्राचीन ठेवा असलेला ‘अक्षय वट’ अनेकदा तोडला आणि जाळला. (विशेष म्हणजे जहांगीरने जितक्या वेळा हा ‘अक्षय वट’ तोडला आणि जाळला, तितक्या वेळा तो त्याच्या मूळ बहरलेल्या स्थितीत परत येई !) यासह जहांगीरने हिंदूंची कुंभपर्वाविषयीची श्रद्धा संपवण्यासाठी कुंभपर्व खंडित करण्याचेही अनेक प्रयत्न केले. त्या काळी आखाड्यांचे साधू-संत छोटे गट बनवून कुंभक्षेत्री प्रवेश करत. हे सहन न झाल्याने जहांगीरने साधू-संतांना कुंभक्षेत्री एकत्र येण्यास थेट बंदी घातली. त्याही पुढे जाऊन त्याने कुंभक्षेत्री गटागटांनी येणार्या साधू-संतांवर आक्रमण करणे चालू केले.
२. नागा साधूंनी जहांगीरला शिकवला धडा !
एकदा जहांगीरच्या आक्रमणात ६० साधू-संत मारले गेले. आखाड्यांत ही वार्ता पोचताच सर्व साधू-संत प्रयागराज येथील कुंभक्षेत्री पोचले. जहांगीरच्या सैन्याने साधू-संतांना कौशांबी क्षेत्राजवळ रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नागा साधूंनी जहांगीरच्या सैन्याविरुद्ध युद्ध केले. १५ दिवस चाललेल्या या घनघोर युद्धात नागा साधूंनी जहांगीरच्या सैन्याचा अक्षरशः धुव्वा उडवत कुंभक्षेत्रात विजयीप्रवेश केला ! त्या काळी पेशव्यांचे राज्य होते. त्यांनी या पराक्रमासाठी नागा साधूंचे अत्यंत भव्य स्वागत करत पालखी, रथ, हत्ती, घोडे आदी देऊन त्यांची मिरवणूक काढली. तेव्हापासून या मिरवणुकीला ‘पेशवाई’ असे म्हटले जाते. दुर्दैवाने आपल्या इतिहासकारांनी नागा साधूंचा धर्माप्रतीचा त्याग, पराक्रम अन् समर्पण यांकडे दुर्लक्ष करून मोगलांचा उदोउदो केला.
३. भव्य मिरवणुकीस आरंभ !
नागा साधूंच्या जहांगीरवरील महापराक्रमी स्वारीची आठवण, म्हणजेच आजची पेशवाई ! तेव्हापासून पेशवाईस आरंभ झाला. सांप्रतकाळी या मिरवणुकीचे स्वरूप भव्य झाले आहे. यात घोडे, बग्गी, पारंपरिक वाद्ये आदींचे अत्यंत आकर्षक प्रदर्शन असते.
४. अशी असते मिरवणूक !
प्रत्येक आखाड्याचे आराध्यदैवत असते. मिरवणुकीत या आराध्यदैवताची पालखी सर्वांत पुढे असते. याद्वारे साधू-संत या आराध्यदैवताप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. त्या पाठोपाठ आखाड्याचे चिन्ह, तसेच ‘निशान’ (ध्वज) असते. आखाडा परंपरेत ‘निशान’ला अनन्यसाधारण महत्त्व असते. याद्वारेच आखाड्यांची ओळख पटते. हे निशान कदापि भूमीवर टेकू दिले जात नाही. त्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. त्या पाठोपाठ आखाड्यांच्या आचार्य महामंडलेश्वरांचा रथ असतो. नंतर त्या आखाड्यांच्या अंतर्गत कार्यरत असणार्या देशभरातील ‘खालसां’चे साधू-संत, मंडलेश्वर आदींचे रथ असतात. सर्व रथांवर राजसी वैभवाचे प्रतीक असलेली छत्री असते.
५. नागा साधू असतात मिरवणुकीचे मुख्य आकर्षण !
दुसरीकडे याच मिरवणुकीत नागा साधू भाला, तलवार आदी पारंपरिक शस्त्रांद्वारे स्वतःचे युद्धकौशल्य प्रदर्शित करतात. याद्वारे ‘आखाड्यांना राजसी वैभव भिक्षेत मिळालेले नाही, तर त्यांनी पुरुषार्थ गाजवून ते मिळवले आहे, तसेच शत्रूशी युद्ध करून धर्माचे रक्षण केले आहे’, हा संदेश दिला जातो. असा हा पेशवाईचा वीरश्री थाट प्रत्येक हिंदूने जीवनात एकदा तरी पहायलाच हवा !
६. नागा साधूंचे अन्य पराक्रम !
अ. वर्ष १६६४ मध्ये क्रूरकर्मा औरंगजेब याने वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरावर आक्रमण केले. त्या वेळी नागा साधूंनी शस्त्र उचलून युद्ध केले आणि औरंगजेबाच्या सैन्याला पिटाळून लावले.
आ. वर्ष १७५७ मध्ये अफगाणचा शासक अहमद शाह अब्दाली याच्या सैन्याने मथुरेत आक्रमण केले. नागा साधूंनी तेथेही तलवार, भाला यांद्वारे युद्ध करून अफगाणी सैन्याचा बीमोड केला. (१६.१२.२०२४)
– श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज, उत्तरप्रदेश.