गुंड जीवन फौजी याने घेतले स्फोटाचे दायित्व !
अमृतसर (पंजाब) : येथे १७ डिसेंबरच्या रात्री ३.१५ वाजता इस्लामाबाद पोलीस ठाण्यात स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच सैन्यही तेथे पोचले; मात्र १५ मिनिटांनी तेथून निघून गेले. राज्य स्पेशल ऑपरेशन सेल या घटनेचे अन्वेषण करत आहे. दुसरीकडे खलिस्तानी आतंकवादी हॅप्पी पासियान याचा साथीदार असणारा गुंड जीवन फौजी याने या स्फोटाचे दायित्व स्वीकारल्याची पोस्ट सामाजिक माध्यमांतून केली आहे. यात एक ऑडिओ (संभाषण) प्रसारित करण्यात आला आहे. याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. नुकताच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पंजाब पोलिसांना राज्यातील पोलीस ठाण्यांवर खलिस्तानी आतंकवादी आक्रमण करू शकतात, अशी माहिती दिली होती.
१. अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर म्हणाले की, पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. हे आक्रमण कशामुळे झाले, याचे अन्वेषण चालू आहे. मोठा आवाज नक्कीच ऐकू आला. लवकरच आम्ही मोठा खुलासा करणार आहोत.
२. जीवन फौजी याच्या ऑडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, पोलीस ठाण्यातील स्फोट, गुंड राजवट चालवणार्या पोलीस आणि पंजाब सरकार यांना चेतावणी आहे. लोकांच्या विरोधात बेकायदेशीर गुन्हे नोंदवले जात आहेत. आम्हाला बेघर केले गेले. आमचे आई-वडील, काका, काकू यांनाही कारागृहात पाठवले. आता या गोष्टीला अशा प्रकारे उत्तर देऊ. पंजाब पोलीस आणि पंजाब सरकार, तुमच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवा. तुम्ही घरोघरी गेला, आम्हीही घरोघरी जाऊ, अशी धमकी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकापंजाबमध्ये गेल्या काही मासांत सातत्याने पोलीस ठाण्यांमध्ये स्फोट घडवून आणले जात आहेत, हे तेथील पोलीस आणि आम आदमी पक्षाचे सरकार यांना लज्जास्पद आहे ! |