Special Trains From Delhi For Mahakumbh : प्रयागराज कुंभपर्वासाठी देहलीहून विशेष रेल्वेगाड्या धावणार !

उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या साडेसात सहस्र बस धावणार

नवी देहली – प्रयागराज महाकुंभपर्वात सहभागी होणार्‍या कोट्यवधी भाविकांच्या सोयीसाठी उत्तर रेल्वे विभागाच्या वतीने विशेष रेल्वेगाड्या चालू करण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या वेळेवर पोचाव्यात, यासाठी त्या २ इंजिनसह चालवणाचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.

१. रेल्वेगाड्यांच्या सामान्य डब्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी १२ सहस्र डब्यांची निर्मिती चालू करण्यात आली आहे. यांपैकी ९०० डबे या आर्थिक वर्षात आधीच जोडले गेले आहेत.

२. प्रवाशांना झटपट तिकीट मिळवून देणे आणि योग्य ती सर्व माहिती पुरवण्यासाठी देहलीती सर्व रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांची संख्या वाढवली जाईल.

३. प्रवाशांना गाडीत सहजपणे चढता आणि उतरता यावे, यासाठी फलाटांवर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत.

४. महाकुंभपर्वाच्या कालावधीत सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आपत्कालीन पथके, स्वच्छता, तसेच रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासह प्रवासी सुरक्षेच्या सूत्राकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या साडेसात सहस्र बस धावणार !

महाकुंभपर्वासाठी उत्तरप्रदेश परिवहन विभागाच्या वतीने विशेष योजना आखण्यात आली आहे. यामध्ये २०० वातानुकूलित बसगाड्या, ६ सहस्र ८०० साधारण गाड्या आणि ५५० शटल बसगाड्या (अल्प अंतरावर असलेल्या बसथांब्यांसाठी वापरण्यात येणार्‍या बसगाड्या) यांचा समावेश असेल. शटल सेवेमध्ये १५० ‘ई-बस’ (वीजेवर धावणार्‍या) गाड्यांचा समावेश असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळासह १७ मार्गांवर ५५० शटल बसगाड्या चालवण्यात येतील. येथील विविध जिल्ह्यांमधून १२ जानेवारीपासून या सेवेस आरंभ होणार आहे.

१. १२ जानेवारी ते २३ जानेवारी, २४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी आणि ८ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ३ टप्प्यांमध्ये या गाड्या सोडण्यात येतील. पहिल्या आणि तिसर्‍या टप्प्यात प्रयागराजसह येथील १० विभागांत एकूण ३ सहस्र ५० बसगाड्या सोडण्यात येतील. दुसर्‍या टप्प्यात मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या दिवशी उर्वरित बसगाड्या सोडण्यात येतील.

२. या महापर्वाच्या कालावधीत राज्यातील सर्व १९ विभागांतील एकूण ७ सहस्र बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये गाजियाबाद विभागातील सर्वाधिक एकूण ६०० बस गाड्यांचा समावेश असेल.

३. या कालावधीत कुंभनगरीत वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ८ तात्पुरती बसस्थानके उभारली जाणार आहेत.