रावबहादूर गोवंडे यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त…
जन्म आणि बालपण
‘ब्रिटीश राजवटीत हरिजन आणि शूद्र स्त्रियांनी शिक्षण घेणे, शाळेत जाणे हे धर्माविरुद्ध असून मुलींना कुमार्गास लावण्याचे द्वारच आहे’, असे समजणार्या लोकांच्या डोक्यातील भूत उतरवण्याचे काम रा.ब. सदाशिवराव बल्लाळ गोवंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सखाराम यशवंत परांजपे आणि मोरोपंत विठ्ठल वाळवेकर यांच्या समवेत चालू केले. ते महार, मांग, चांभार इत्यादी जातींना शिक्षण देणार्या संस्थेचे रा.ब. सदाशिवराव गोवंडे हे अध्यक्ष होते. अशा सामाजिक क्रांतीकारकाचा जन्म पुण्यातील काळा हौद येथे ८ डिसेंबर १८२४ मध्ये झाला. सदाशिवराव गोवंडे यांचे पूर्वज जरी मूळचे कोकणातील असले, तरी त्यांचे आई-वडील पुण्यातील काळ्या हौदाजवळ रहात होते. त्यांचा जन्म अतिशय गरीब घराण्यात झाला.
सदाशिवराव गोवंडे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यातच झाले. लिहिता-वाचता येऊ लागले की, ‘हायस्कूल’मध्ये इंग्रजी शाळेत प्रवेश मिळे. ते अतिशय हुशार असल्याने त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर विश्रामबाग वाड्यात सरकारी नोकरी पत्करली. १९ व्या वर्षी संस्कृत पाठशाळेत शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर ऑगस्ट १८५० मध्ये नगर न्यायालयात लिपिकाची नोकरी केली. उत्कृष्ट कामाविषयी त्यांना नामदार व्हाईसरॉय यांनी ‘रावबहादूर’ हा किताब दिला.
स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न
भारतातील लोक गरीब, अडाणी तर होतेच; पण त्याचसमवेत धर्मनिष्ठही होते. त्यामुळे काम करणे सोपे नव्हते. स्पृश्य-अस्पृश्य भेद आणि स्त्री शिक्षणाविना लोकांची प्रगती होणार नाही, हे गोवंडे, फुले, परांजपे आणि वाळवेकर यांनी ओळखल्याने सदाशिवरावांनी भोकरवाडी येथील अहिल्याश्रमाची जागा शाळेसाठी दिली. शालेय साहित्यामध्ये पाटी-पेन्सिलीही दिल्या. मुली आणि मुले यांना उत्तेजन देण्यासाठी पोटापुरते वेतन आणि शिष्यवृत्ती देण्याच्या युक्त्या करून सदाशिवराव अन् ज्योतिबा यांनी स्त्रीशिक्षणाची सवय लावली अन् महिन्याला २ रुपये देण्याचेही मान्य केले. सदाशिवराव गोवंडे आणि ज्योतिबा फुले हे दोघेही बंधूप्रमाणे रहात होते.
‘पुणे सार्वजनिक सभे’ची स्थापना
धर्मातील अनिष्ट चालीरिती, रूढी, परंपरा, स्त्री शिक्षण, सतीप्रथा, अंधश्रद्धा यांसाठी अतोनात प्रयत्न आणि कष्ट घेतले. हे काम करीत असतांनाच गणेश वासुदेव जोशी उपाख्य ‘सार्वजनिक काका’ यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. रयतेची सर्वच गार्हाणे सरकारदरबारी मांडण्यासाठी व्यापक व्यासपीठ असावे, यासाठी २ एप्रिल १८७० मध्ये ‘पुणे सार्वजनिक सभे’ची स्थापना केली. ते संस्थापक सदस्य होते. सभेचे प्रारंभीपासूनच काम करीत असल्याने लोकमान्य टिळक, हरी गोपाळ गोखले, रामचंद्र पटवर्धन, नीळकंठ गोखले, माधवराव फडणीस, कृष्णाजी मुलकर, विष्णुपंत भिडे आणि श्रीमंत श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांच्यासारख्या मातब्बर मंडळीसमवेत त्यांनी काम केले. त्या वेळी रा.ब. सदाशिव गोवंडे यांनी सार्वजनिक सभेचे ‘ऑनररी सेक्रेटरी’ म्हणून काम पाहिले.
‘स्त्री-विचारवती सभे’ची स्थापना
ब्रिटीश राजवटीत लहान-सहान तंटेही न्यायालयात प्रविष्ट होत असत. त्यांना चोख न्याय मिळत असे; पण तो प्रकार खर्चिक आणि वेळखाऊपणा अन् मनःस्ताप देणारा होता. पर्यायी म्हणून सार्वजनिक सभेने इंग्रजपूर्व न्यायदान पद्धतीकडे लक्ष घातले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्या काळात न्यायपंचायत, न्यायपद्धतीने त्या त्या गावातील खटले चालवले जात. त्यात अधिवक्ता देण्याची आवश्यकता नसे. वादी आणि प्रतिवादी स्वत:ची बाजू मांडीत. त्यामुळे न्यायही तातडीने मिळे, खर्चही अल्प होई. याचा लाभ देण्यासाठी सार्वजनिक काकांचे बरोबरीने रा.ब. सदाशिवराव गोवंडे यांनीही महत्त्वपूर्ण काम केले. सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना एकत्र येऊन हळदी-कुंकू समारंभ साजरे होण्यासाठी त्यांनी वर्ष १८७३ साली ‘स्त्री-विचारवती सभे’ची स्थापना केली, ती प्रथा आजही चालू आहे.
स्वदेशी वस्तूंच्या वापरास प्रोत्साहन
रायबहाद्दूर यांचे बोलणे सत्य आणि स्पष्ट असे. धोतरबंदाचा अंगरखा, खांद्यावर उपरणे, डोक्याला पागोटे आणि पायात पुणेरी लाल जोडे असा त्यांचा पेहराव होता. स्वदेशी व्यवहारात इंग्रज राज्यकर्ते हिंदुस्थानातील संपत्तीचे शोषण करीत असल्याने त्यांच्याच वस्तू हिंदुस्थानात विकून पुष्कळ संपत्ती परदेशात नेत असल्याने त्यांनी स्वदेशीच वस्तू वापरण्याचा लोकांपुढे आदर्श ठेवला. परदेशी वस्तूंची होळी केली आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. ब्रिटीश राजवटीतील विविध प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले आणि प्रयत्न केले. अशा सामाजिक क्रांतीकारकाचे स्मरण व्हावे, हा प्रपंच ! त्यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली !
– श्री. धनाजी का. चन्ने, उपाध्यक्ष, पुणे सार्वजनिक सभा, पुणे.
संपादकीय भूमिकाकुठे भारतीय क्रांतीकारकांची स्मारके जपणारा इंग्लंड आणि कुठे क्रांतीकारकांना विसरणारा भारत देश ! |