|
पुणे – शहरात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे (‘जी.बी.एस्.’चे) संशयित रुग्ण वाढत आहेत. महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समावेश झालेल्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) खडकवासला, किरकिटवाडी, नांदोशी, नांदेड या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा करणे सध्या शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धरणातून पुणे शहरासाठीचा वाढीव कोटा संमत होत नसल्याने या गावांना हे पाणी देणे शक्य नाही. (स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर अशी स्थिती असणे कितपत योग्य ? – संपादक)
या गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या गावांना महापालिकेने जलशुद्धीकरणातून शुद्ध केलेले पाणी द्यायला हवे, अशी शिफारस पाणी पडताळणी (तपासणी) करणार्या प्रयोगशाळेने केली आहे. या गावांसह १० गावांतील नागरिकांना पाणी देण्यासाठी सध्या महापालिकेला मिळत असलेल्या पाण्यामध्ये २५ एम्.एल्.डी. वाढीव पाणी मिळावे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे.
महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सूस-म्हाळुंगे येथे जलवाहिनी आणि टाक्या बांधल्या जातील. बावधन भागात काम करून थेट पाणीपुरवठा केला जाणार आहे. लोहगाव-वाघोली या टप्प्याचेही काम चालू आहे. टप्प्याटप्प्याने या सर्व गावांना पाणीपुरवठा केला जाईल. यासाठी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यय अपेक्षित आहे, असे महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांचे म्हणणे आहे.