भारत ही सनातनचा जागर करण्याची भूमी ! – खाना मां, सनातन धर्मप्रचारक, रामकृष्ण दिग्दर्शन सेवाश्रम, कोलकाता

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास भेट !

प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) – भारत ही सनातनचा जागर करण्याची भूमी आहे, असे मार्गदर्शनपर उद्गार कोलकाता येथील ‘रामकृष्ण दिग्दर्शन सेवाश्रमा’च्या सनातन धर्मप्रचारक खाना मां यांनी येथे काढले. सनातन संस्थेच्या मोरी मार्ग येथील ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला त्यांनी २४ जानेवारी या दिवशी भेट दिली. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या वेळी कोलकात्यातील रामकृष्ण आश्रमाचे सरचिटणीस स्वामी शारदानंद, तसेच अन्य भक्त उपस्थित होते.

खाना मां

खाना मां पुढे म्हणाल्या, ‘‘सध्या काही हिंदु धर्मीय पाश्चात्त्यांचे मोठ्या प्रमाणात अंधानुकरण करत आहेत. याविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण करून त्यांना त्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. अशी जागृती सनातन संस्थेच्या या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनातून केली जात आहे. आज जे स्वतःला अन्य धर्मीय म्हणवतात, त्यांचेही मूळ सनातनीच आहे. आज आपली भावी पिढी भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी यांत अडकली आहे, त्यांना त्यातून बाहेर काढले पाहिजे. या प्रदर्शनात जे जे सांगितले आहे, ते शेकडो वर्षांपूर्वी आपल्या ऋषिमुनींनी सांगून ठेवलेच आहे. असे प्रदर्शन संपूर्ण देशात लावले पाहिजे. बंगालमध्ये आम्ही सनातनच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करू.’’


मनुष्याने देव बनण्यासाठी सनातनचे प्रदर्शन पहावे ! – स्वामी शारदानंद, सरचिटणीस, रामकृष्ण आश्रम, कोलकाता

स्वामी शारदानंद

स्वामी शारदानंद म्हणाले, ‘‘महाकुंभपर्वातील सनातन संस्थेचे प्रदर्शन हे हिंदु संस्कृतीचे जीवनदर्शन आहे. समाज धर्मापासून भरकटला असल्याने कुणालाच सुख, शांती, समृद्धी, समाधान आणि आनंद मिळत नाही. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने समाज दिशाहीन झाला आहे. धर्म हा अत्यंत पवित्र आहे. वेद, उपनिषदे यांतील ज्ञान समाजाला देणे आवश्यक आहे. गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अवलंब केला, तरच धर्माचरणी पिढी निर्माण होऊ शकेल. मनुष्याने देव बनण्यासाठी सनातनचे प्रदर्शन पहावे. यासाठीचे सर्व ज्ञान देणारे ग्रंथ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात उपलब्ध आहेत, हे पाहून आनंद झाला. सनातन संस्थेच्या या कार्याचे कौतुक वाटते. भारताचे तुकडे होऊन दोन इस्लामी देशांची निर्मिती झाली; पण १०० कोटी हिंदूंसाठी हिंदु राष्ट्र निर्माण झाले नाही, याचे अत्यंत दु:ख आहे. त्यामुळे हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हेच आमचे लक्ष्य आहे.’’