Railway Prepared For Mauni Amavasya : मौनी अमावास्येला प्रयागराज येथे येणार्‍या भाविकांसाठी रेल्वेकडून विशेष व्यवस्था !

प्रयागराज – महाकुंभपर्वात २९ जानेवारी या दिवशी मौनी अमावास्येला संगम स्नानासाठी १० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. २५ जानेवारीपासून प्रतिदिन १ कोटी भाविक प्रयागराज येथे पोचत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात येणार्‍या भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये आणि भाविकांना सुरक्षितपणे स्नानाला जाता यावे, यांसाठी प्रयागराज रेल्वे विभागाकडून शहरातील सर्व रेल्वे स्थानकांवर विशेष योजनेसह काही प्रतिबंध लावण्यात आले आहेत. सर्व प्रतिबंध मौनी अमावास्याच्या पूर्वी १ दिवस आणि नंतर २ दिवसांपर्यंत लागू असतील.

१. प्रयागराज जंक्शन या रेल्वे स्थानकावर प्रवेश करणे आणि बाहेर पडणे यांसाठी मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत.

२. प्रयागराज रेल्वे जंक्शन येथे प्रवेश केवळ सिटी साईड प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून देण्यात येईल.

३. प्रयागराज रेल्वे जंक्शन येथून बाहेर पडण्यासाठी सिव्हील लाईन साईड प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून येथून मार्ग असेल.

४. आरक्षण असलेल्या प्रवाशांना सिटी साईडच्या ५ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराहून स्वतंत्र प्रवेश दिला जाईल.

५. आरक्षण नसलेल्या प्रवेशांना दिशावार ‘कलर कोडेड आश्रय स्थळां’च्या माध्यमातून प्रवेश देण्यात येईल. या आश्रयस्थळांमध्ये तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

६. अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवता येण्यासाठी खुसरो बाग येथे १ लाख प्रवासी थांबू शकतील अशी जागा निर्माण केली आहे.

७. अशाच प्रकारची व्यवस्था शहरातील नैनी, छिवकी आणि सुबेदारगंज या रेल्वे स्थानकांवरही करण्यात आली आहे.