कणकवली – अध्यात्मामध्ये किती शक्ती आहे, हे मी माझ्या लहानपणापासून अनुभवले आहे. माणसाचे मन इंद्रियांचा राजा आहे. मनाची निकोपता वाढण्यासाठी अध्यात्म अंगीकारणे आवश्यक आहे. मानव विकार नष्ट करू शकत नाही; परंतु या विकारांवर नियंत्रण मिळवू शकतो आणि यासाठीचे सामर्थ्य भागवत संप्रदायातून मिळत असते, असे मार्गदर्शन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवली विभागीय कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केले. कणकवली तालुक्यातील साकेडी येथील वाळकेश्वर नवतरुण भजन मंडळाने जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी सर्वगोड बोलत होते. या वेळी माजी सभापती संजय शिरसाट, स्पर्धेचे परीक्षक विलास ऐनापुरे, सरपंच सुरेश साटम, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
सर्वगोड पुढे म्हणाले, ‘‘आपला भाव चांगला पाहिजे. आपल्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे आणि ही खरी साधुसंतांची शिकवण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात अध्यात्माची चळवळ यांनी रुजवली आहे. मनातील द्वेष, मत्सर घालवूया. सर्वांवर प्रेम करूया. भारताला समृद्ध बनवण्याचे ध्येय ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया. जिल्ह्यात माझ्या विभागाच्या माध्यमातून मी जी कामे करू शकलो, त्याचे श्रेय वारकरी संप्रदायाच्या विचारांना जाते. आजची तरुण पिढी चुकीच्या मार्गाने जात असल्याचे चित्र दिसत असतांना तरुण वर्गाकडून वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासला जाणे हे
निश्चित कौतुकास्पद आहे.’’ या वेळी अन्य मान्यवरांनीही त्यांचे विचार व्यक्त केले.