चैतन्यस्नान !

महाकुंभमेळा विशेष

वृत्तनिवेदक सुधीर चौधरी

माता गंगा ही साक्षात् भगवंताच्या मस्तकातून निघत असल्यामुळे ती परम् पवित्र आहे. तिचे ‘याची देही याची डोळा’ दर्शन घेण्याचे, तिच्यात स्नान करण्याचे भाग्य ज्या भारतियाला लाभले नाही, त्या भारतियाचा जन्म भारतात होऊन व्यर्थ आहे. थोडीफार साधना करणार्‍यालाही केवळ गंगादर्शनाने आनंद मिळतो, त्यातील स्नानाचे पावित्र्य अनुभवता येते. कुंभमेळ्यात तर गंगेप्रमाणेच पवित्र असलेल्या यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमात अन् विशिष्ट ग्रहस्थिती, तसेच तिथी यांना स्नान करण्याचे परम्भाग्य ज्यांना लाभले, ते धन्य झाले, असेच म्हणावयास हवे.

सध्या वृत्तवाहिन्या कुंभमेळ्याविषयीची विविध वृत्ते त्यांच्या त्यांच्या स्तरावर विविध पद्धतीने देत असतांना ‘आज तक’ या वाहिनीवर सुप्रसिद्ध हिंदुत्व आणि राष्ट्र निष्ठ वृत्तनिवेदक सुधीर चौधरी यांनी मात्र ‘कुंभमेळ्यात स्नान करतांना मनात काय भाव ठेवा ?’, याविषयी सुंदर विवेचन केले. ते म्हणाले, ‘‘सर्वप्रथम तुम्ही तुमचे चित्त, मन, डोके शांत ठेवा. तुमच्यामधील शांतता तुम्ही अनुभवा. हे अनुभवल्यावर गंगेत डुबकी मारतांना तुम्ही तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता, वाईट भावना, वाईट अनुभव आठवा, ते आणि तुमच्यातील अनिष्ट शक्ती हे सर्व एकत्र करा अन् इथे सोडून द्या. निर्मळ मनाने भगवंताचे स्मरण करा. जेव्हा तुम्ही येथून जाल, तेव्हा तुम्हाला एक वेगळाच हलकेपणा जाणवेल, तो तुमच्या जीवनातील शांतीचा अनुभव असेल. हे केवळ पाण्यात डुबकी मारण्याचे स्नान नाही. या स्नानाला वाया जाऊ देऊ नका. हे स्नान तुमच्या स्वातंत्र्यासाठी आहे, तुमच्या आत्म्याच्या, शरिराच्या, विचारांच्या शुद्धीसाठी आहे. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आहे. शक्ती प्राप्त करण्यासाठी आहे. तुमचा आत्मा प्रसन्न होण्यासाठी आहे. हा अनुभव घेऊन तुम्ही येथून जा. हर हर गंगे ।’’

या कार्यक्रमात त्यांनी आणखी एक चांगले सूत्र सांगितले, ‘‘कुंभमेळ्यात येणे, म्हणजे पर्यटनाला येणे नव्हे, तर ही तपस्या आहे आणि जेव्हा तुम्ही देवाच्या दर्शनाला जाता, तेव्हा काही ना काही तप तुम्हाला करावे लागतेच. तीर्थक्षेत्राला जातांना थोडेफार कष्ट होतातच. कठोर तपस्येनंतरच देवाकडे जाता येते. त्यामुळे इथे काही गैरसोय झाली, तर ती स्वीकारणे, ही तपस्या आहे, हे लक्षात घ्या. इथे सर्व सुविधा केल्या आहेत; परंतु तुम्ही सहलीप्रमाणे येथे सुखसोयींची अपेक्षा धरून येऊ नका. तुम्ही येथे तुमच्या धर्मासाठी येता. तुमच्या तपासाठी येता. तपस्येला तुम्हाला सिद्धता करूनच जावे लागते.’’

एका मोठ्या वृत्तवाहिनीच्या संपादकाने वार्ताहर बनून तीर्थक्षेत्रीच्या आध्यात्मिक स्तरावरील स्नानाचा अनुभव स्वतः घेऊन आध्यात्मिक स्तरावर काय अनुभवले, ते शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला, हे अत्यंत कौतुकास्पद, अनुकरणीय अन् पुरोगाम्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे !

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.