Saraswati Puja Banned : झारखंड सरकारच्या ‘राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मध्ये सरस्वती पूजा साजरी करण्यावर बंदी !

मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर निर्णय मागे घेतला !

रांची (झारखंड) – येथील ‘राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आर्.आय.एम्.एस्.)’ मध्ये सरस्वती पूजा साजरी करण्यावर बंदी घालण्यात आली होता. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेला हा कार्यक्रम रहित करण्याचा आदेश देण्यात आला होता. ‘आर्.आय.एम्.एस्.’च्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना ऐनवेळी पूजेविषयीची सर्व सिद्धता थांबवण्याची आणि देणगीचे पैसे परत करण्याचे आदेश दिले; परंतु यास कडाडून विरोध झाल्याने रहित करण्याचा आदेश मागे घेण्यात आला.

आरोग्य मंत्री इरफान अन्सारी

१. प्रतिवर्षी विद्यार्थी एकत्रितपणे ‘आर्.आय.एम्.एस्.’मध्ये सरस्वती पूजा आयोजित करतात. हा कार्यक्रम ‘एम्.बी.बी.एस्.’च्या दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून आयोजित केला जातो. या वर्षीच्या सरस्वती पूजा उत्सवासाठी विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांच्या देणग्या गोळा करून सर्व व्यवस्था केली होती. सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले होते.

२. ‘आर्.आय.एम्.एस्.’च्या अधिष्ठाता (डीन) शशिबाला सिंह यांनी २५ जानेवारीला अचानक पूजा रहित करण्याचा आदेश जारी केला. ‘आर.आय.एम्.एस्.’ प्रशासनाच्या या आदेशावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

३. ‘आर्.आय.एम्.एस्.’चे न्यूरोसर्जन डॉ. विकास कुमार यांनीही या आदेशाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आर्.आय.एम्.एस्.’चे उच्चपदस्थ अधिकारी त्यांची न्यूनता लपवण्यासाठी देशाच्या सांस्कृतिक परंपरांवर थेट आक्रमण करत आहेत, जे प्रत्येक दृष्टीकोनातून निषेधार्ह आहे.

४. भाजपकडून या निर्णयाला प्रखर विरोध करण्यात आला. सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर ‘आर्.आय.एम्.एस्.’ने बंदीचा निर्णय मागे घेतला.

आरोग्य मंत्री इरफान अन्सारी यांच्या हिंदुद्वेष्ट्या मानसिकतेमुळे देण्यात आला आदेश ! – भाजप

माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी

भाजपनेही सामाजिक माध्यमांवरून झारखंड सरकारवर निशाणा साधला. आरोग्य मंत्री इरफान अन्सारी यांच्या जातीय मानसिकतेमुळे ही बंदी घालण्यात आल्याचा आरोप भाजपचे झारखंड राज्याचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केला. त्यांनी याचे वर्णन धार्मिक विभाजनाला चालना देणारे असे केले.

संपादकीय भूमिका 

हिंदूंनी हिंदुद्वेषाने बरबटलेल्या सत्ताधारी ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ला पुन्हा निवडून दिल्याचेच हे फलित आहे, हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे !